Kalyan News : काही मिनिटांच्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कल्याणमधील निकृष्ट दर्जाचं काम उघड, चौकशीची मागणी

स्मार्ट सिटीअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नोवल गॅलरीमधील पाणबुडीचा एक भाग सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Kalyan News : स्मार्ट सिटीअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नोवल गॅलरीमधील पाणबुडीचा एक भाग सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिलिकॉन भरण्याचं काम सुरू असताना जोरदार वाऱ्यामुळे हा प्रकार घडल्याचं संबंधित ठेकेदारांकडून सांगण्यात आलं आहे. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सभागृहनेते वरुण पाटील यांनी केली आहे. 

नेमकं काय घडलं? 

कल्याण-डोंबिवली परिसरात गुरुवारी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन सोसाट्याचा वारा सुरू झाला. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी धुळीचे लोट पसरले होते. काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. दरम्यान कल्याणमधील एके ठिकाणी हॉलचे शेड रस्त्यावर पडल्याने दोन जण जखमी झाले आहेत. 

Advertisement

यादरम्यान, कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी गणेश घाट परिसरात तयार करण्यात आलेल्या नोवल गॅलरीमधील पाणबुडीचा एक भाग अचानक कोसळला. ही घटना घडल्यानंतर केडीएमसी सभागृहनेते वरुण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बोलताना त्यांनी या कामात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केला. “काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून चौकशीची मागणी करणार आहोत. कोट्यवधी रुपये खर्च करून असे प्रकार होत असतील तर ते अतिशय दुर्दैवी आहे. दोषींवर तातडीने कारवाई झाली पाहिजे,” असं त्यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा - Palghar News : उकाडा जीव घेतोय? बसमध्ये चढण्यापूर्वी भोवळ येऊन महिलेचा जागीच मृत्यू; पालघरमधील हादरवणारी घटना

नोवल गॅलरीचे काम करणाऱ्या देव इंजिनिअरिंग कंपनीचे ठेकेदार रिचर्ड यांनी सांगितलं की, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणबुडीला सिलिकॉन लावण्याचं काम सुरू होतं. त्याचवेळी अचानक जोरदार वारा सुरू झाल्याने हा प्रकार घडला. “कामात कोणत्याही प्रकारचा निकृष्टपणा करण्यात आलेला नाही. मुख्य स्ट्रक्चरला कोणतेही नुकसान झालेले नाही. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. याबाबत केडीएमसी अधिकारी रोहिणी लोकरे यांनी सांगितलं की, पाणबुडीच्या मुख्य संरचनेला कोणतेही नुकसान झालेले नाही. सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेले अतिरिक्त क्लॅडिंग कोसळले असून दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत. आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.