अमजद खान
सोशल क्लबच्या पडद्याआड जुगार- मटक्याचे गोरखधंदे चालविणाऱ्या मटका किंग मुनिया अर्थात जिग्नेश ठक्कर याचा काटा काढल्यानंतर धर्मेश उर्फ नन्नू शहा हा गँगस्टर गेल्या पाच वर्षांपासून जेलची हवा खात आहे. जवळपास डझनभर गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी असलेल्या मुनियाचे सोशल क्लबच्या नावाखाली मटका-जुगाराचे धंदे बिनबोभाट सुरू असताना त्याच्या मृत्यूनंतर या धंद्यांसह गुन्हेगारीची सूत्रे जेलमधून हलविणाऱ्या गँगस्टर नन्नू शाहचा वारसदार कोण? यावरून स्थानीय पातळीवर चर्चा सुरू आतानाच नन्नूचा पुतण्या सूरज शहा याने खंडणीसाठी बिल्डरला धमकावल्याच्या निमित्ताने डोके वर काढले आहे. जेलमधून लोकल अंडरवर्ल्डची सूत्रे हलविणाऱ्या गँगस्टर नन्नू शाह याच्या हालचालींवर नजर ठेवणाऱ्या पोलिसांनी त्याच्या पुतण्याची चौकशी सुरू केली आहे.
कल्याण रेल्वे स्थानकासमोर असलेल्या नीलम गेस्ट हाऊसच्या गल्लीत 31 जुलै 2020 रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास मटका किंग मुनिया उर्फ जिग्नेश ठक्कर याची 5 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या मुनियाचा एकेकाळचा साथीदार धर्मेश उर्फ नन्नु नितिन शहा याच्यासह त्याचा ड्रायव्हर कम बाऊन्सर जयपाल उर्फ जापान या दोघांनी मिळून केली. मुनियाला अगदी जवळून गोळ्या झाडणारा जयपाल उर्फ जापान डुलगज पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या हत्येचे गुपित उघड झाले. जयपाल उर्फ जापान हा मुनियाचा प्रतिस्पर्धी धर्मेश उर्फ नन्नु नितिन शहा याचा ड्रायव्हर कम बाऊन्सर आहे. सद्या हे दोघेही बदमाश तळोजा तुरूंगाची हवा खात आहेत.
मटका किंग मुनियाच्या हत्येतील मुख्य मारेकरी धर्मेश उर्फ नन्नू शहा हा एकेकाळी छोटा राजन गँगमधील टॉपचा शार्प शुटर मानला जायचा. धर्मेश उर्फ नन्नू हा 1980 च्या दशकापासूनच गुन्हेगारी क्षेत्रात तग धरून असून त्याच्या नावावर खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, आदी 15 गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी क्षेत्रात वर्चस्व तसेच आर्थिक वादातून आपल्या बालपणीचा मित्र मुनिया उर्फ जिग्नेश याला ढगात पाठवणाऱ्या धर्मेश उर्फ नन्नू नितिन शहा आणि त्याचा ड्रायव्हर कम बाऊन्सर जयपाल उर्फ जापान या दोघांनी अन्य 2 साथीदारांसह तेथून पळ काढला. मटका किंग जिग्नेशचा मुडदा पाडून मुख्य शूटर नन्नू शहा हा भूमिगत झाला होता. पोलिस चकमकीच्या भीतीने तो गुजरातला पळाला. पोलिसांनी त्याच्या 29 ऑगस्ट 2020 रोजी गुजरातमधून मुसक्या आवळल्या. सद्या हा गँगस्टर तुरूंगात अंडरट्रायल आहे.
मटका किंग मुनियाच्या मृत्यूनंतर त्याच्या गोरख धंद्यांचा वारसदार म्हणून लोकल अंडरवर्ल्डमध्ये गँगस्टर धर्मेश उर्फ नन्नू शहा याचे नाव घेतले जाते. तथापी काकाच्या पावलावर पुतण्यानेही गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवल्याचे खंडणी प्रकरणातून उघडकीस आले आहे. कल्याणमधील बांधकाम व्यावसायिक किरण निचळ यांना 15 लाखांच्या खंडणीसाठी धमकावले आहे. पेट्या दिल्या नाही तर टपकावण्याची त्याने धमकी दिली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या पार्श्वभूमीवर चौकस तपास सुरू केला आहे. खुनाच्या गुन्ह्यात तुरूंगात असलेला काका नन्नू शहा याच्या संपर्कात त्याचा पुतण्या सूरज आहे का ? काकाचे नाव वापरण्यामागचे कारण काय ? काकाचे नाव वापरून सुरज याने आतापर्यंत किती लोकांकडून खंडण्या उकळल्या आहेत ? याचा चौकस तपास पोलिसांनी सुरू केला आहे.