KDMC News : एका जमिनीच्या वादातून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे (KDMC) कर्मचारी दीपक म्हात्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यात बदलापूर येथील गोळीबार प्रकरणात फरार असलेला सराईत गुन्हेगार अप्प्या दांडे आणि त्याच्या पाच साथीदारांचा समावेश असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, अप्प्या दांडेसह चार जणांचा शोध सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा परिसरात दीपक म्हात्रे यांच्यावर सहा अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने कल्याण पूर्वेकडील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
( नक्की वाचा : Kalyan News : '15 लाख दे, नाहीतर खल्लास करेन!' गँगस्टरच्या पुतण्याकडून कल्याणच्या व्यावसायिकाला धमकी )
जमिनीच्या वादातून हल्ला?
दीपक म्हात्रे यांचा बोडके नावाच्या व्यक्तीसोबत जमिनीवरून वाद सुरू आहे. म्हात्रे यांच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, याच जमिनीच्या वादातून त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आला आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, या हल्ल्यासाठी अप्प्या दांडेला सुपारी देण्यात आली होती.
फरार आरोपींचा शोध
अप्प्या दांडे हा बदलापूरमध्ये भाजप आमदार किसन कथोरे यांच्या घराच्या परिसरात दुसऱ्या एका गुन्हेगारावर गोळीबार केल्याप्रकरणी फरार आहे. कोळसेवाडी पोलिसांनी अप्प्या आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, अप्प्या आणि त्याच्या साथीदारांचे सीसीटीव्ही फुटेज त्यांच्या हाती लागले आहे. अप्प्याला अटक केल्यावरच दीपक म्हात्रे यांच्यावर हल्ला करण्याची सुपारी कोणी दिली हे समोर येईल, अशी पोलिसांना आशा आहे.