Kalyan News : कल्याणच्या खडेगोळवली परिसरात दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेतील दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या गटातच किरकोळ कारणावरून वाद होऊन तुंबळ हाणामारी झाली. पोलिस ठाण्यात झालेल्या या 'राड्या'चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत राडा करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले असून पुढील प्रक्रिया सुरु आहे.
काय आहे प्रकरण?
खडेगोळवली परिसरात शेख आणि सोनकर ही कुटुंबं शेजारी राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, शेख कुटुंबातील एका तरुणाने घरातील कचरा घराबाहेर टाकला. यावर सोनकर कुटुंबीयांनी आक्षेप घेत कचरा कुठेही न टाकण्याबद्दल सांगितले. या कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत अर्जून सोनकर, सोनू सोनकर आणि त्यांची आई निर्मला सोनकर हे 3 जण गंभीर जखमी झाले.
सचिन सोनकर या जखमी तरुणानं याबाबत प्रतिक्रिया देताना गंभीर आरोप केले आहेत. तो म्हणाला "मी कॉलेजमधून घरी आलो तेव्हा शेख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आमच्या घरात घुसून मारहाण केली. माझ्या वडिलांना अर्धांगवायू झालेला असतानाही त्यांना हाताने मारले. माझ्या आई आणि बहिणीला मारहाण केली.
( नक्की वाचा : Ambernath: अंबरनाथमध्ये 'ड्रग्ज माफिया' पती-पत्नीला अटक; एकावर 21 तर दुसऱ्यावर 4 गुन्हे दाखल )
मोठ्या भावाचे डोके फोडले असून, त्याला 15 टाके पडले आहेत," असे सचिनने सांगितले. भांडण सोडवताना कोयत्याने हल्ला केल्याचा आरोपही त्याने केला. तसेच, नवरात्रीच्या काळातही घरासमोर कचरा टाकणे, 'हा आमचा भाग आहे, तुम्हाला राहू देणार नाही' अशी धमकी देणे, तसेच बहिणीची छेडछाड करणे आणि शिवीगाळ करणे, असे आरोपही सचिन सोनकरने केले आहेत.
पोलिस ठाण्यातच कार्यकर्त्यांमध्ये राडा
या मारहाणीतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शैलेश तिवारी, विनोद तिवारी, हर्षल साळवे, सी. पी. मिश्रा आणि अन्य कार्यकर्ते पीडितांसह कोळसेवाडी पोलिस ठाण्यात पोहोचले होते. पोलिस अधिकाऱ्यांसोबत त्यांची चर्चा सुरू असतानाच, एका गटातील काही तरुण पोलिस ठाण्याच्या आवारात आपसात भिडले.
सूत्रांनुसार, चर्चेदरम्यान एक तरुण बाहेर आला. त्याला शिवा पांडे नावाच्या तरुणाने 'आतमध्ये काय सुरू आहे?' असे विचारले. त्यावर 'मी काय खबरी आहे का?' असे उत्तर दिल्याने त्यांच्यात वाद वाढला आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. या राड्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या काही पोलिसांनाही धक्काबुक्की झाल्याचे वृत्त आहे.
कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्येच हाणामारी झाल्यानं पोलिसांनी तातडीने कठोर भूमिका घेतली. या राड्यात सामील असलेल्या तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, आता पोलिस या प्रकरणात काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.