Kalyan News: कल्याण पश्चिमेतील मोहणे परिसरात व्हाट्सअप डीपीवर शत्रूचा फोटो ठेवल्याच्या किरकोळ वादातून एका गटाने तरुणावर दोन राऊंड गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात मोनू फुलोरे हा तरुण थोडक्यात वाचला असून गोळीबार करणाऱ्या अभिषेक पवार उर्फ अभी याने स्वतःवरच गोळी झाडून घेतली आहे. या खळबळजनक प्रकरणाचा तपास करत खडकपाडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून जखमी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे.
काय आहे कारण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहणे परिसरातील पाटील नगरमध्ये राहणारा अभिषेक पवार उर्फ अभी आणि गौरव साळुंखे यांच्या गटात जुना वाद आहे. यादरम्यान, 26 मे रोजी मोनू फुलोरे नावाच्या तरुणाने गौरव साळुंखेसोबतचा एक फोटो आपल्या व्हाट्सअप डीपी आणि स्टेटसवर ठेवला होता. माझ्या शत्रूचा फोटो स्टेटसवर का ठेवला, याच कारणावरून अभिषेक उर्फ अभी प्रचंड भडकला आणि त्याने मोनूचा गेम करण्याचा प्लॅन आखला.
रात्रीच्या अंधारात टोळीसह येऊन गोळीबार
हाच राग मनात धरून शुक्रवारी रात्री अभिषेक पवार आपल्या 10 ते 12 साथीदारांना सोबत घेऊन मोनू फुलोरेला शोधण्यासाठी पाटील नगरमध्ये दाखल झाला. अभिषेक आणि त्याची टोळी हत्यारांसह आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच मोनू फुलोरे आणि त्याचा भाऊ जीव वाचवण्यासाठी तिथून पळून गेले. मात्र, रागाच्या भरात असलेल्या अभिषेकने पळणाऱ्या मोनूच्या दिशेने थेट 2 राऊंड गोळीबार केला. या गोळीबारातून मोनू कसावसा सुखरूप वाचला, त्यानंतर झालेल्या गोंधळात अभिषेकने स्वतःच्याच हातावर एक गोळी झाडून घेतली.
( नक्की वाचा : Ambernath News: 'आधी सापाचा फोटो दाखवा, मगच उपचार करू'; अंबरनाथच्या चिमुरड्याने गमावले प्राण! डॉक्टर म्हणतात... )
तपासात सत्य समोर
या घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सुरुवातीला मोनू फुलोरे यानेच गोळीबार केल्याची अफवा पसरवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र पोलिसांनी सखोल तपास केला असता अभिषेकनेच गोळीबार केल्याचे सत्य समोर आले. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी सोहेल तांबोळी आणि विजय भुतकर या दोन तरुणांना अटक केली आहे. तसेच स्वतःवर गोळी झाडून घेतलेला मुख्य संशयित अभिषेक पवार सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.