Kalyan News: कल्याणमध्ये भररस्त्यात नेमकं काय घडलं? एका बाटलीसाठी हॉटेल चालकावर तुटून पडले नशेखोर, पाहा VIDEO

Kalyan News: कल्याणमध्ये एका साध्या कारणावरून सुरू झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना घडली आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

Kalyan News: कल्याणमध्ये एका साध्या कारणावरून सुरू झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला बसून मद्यपान करणाऱ्या काही जणांनी एका हॉटेल चालकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. ही घटना सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या नशेखोरांच्या उच्छादामुळे घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

काय आहे प्रकरण?

कल्याण पूर्वेतील मेट्रो मॉल परिसरात रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला बसून काही व्यक्ती मद्यपान करत होत्या. यावेळी या तळीरामांनी जवळच असलेल्या एका हॉटेल चालकाकडे कोल्ड्रिंकची मागणी केली. त्यानंतर त्यांनी थंड पाण्याची बॉटल मागितली. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव हॉटेल चालकाने थंड पाण्याची बॉटल देण्यास नकार दिला.

Advertisement

हा नकार ऐकताच मद्यधुंद अवस्थेत असलेल्या त्या व्यक्तींचा पारा चढला. त्यांनी सुरुवातीला हॉटेल चालकाला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि त्यानंतर थेट अंगावर धावून जात त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

( नक्की वाचा : Dombivli News: खोट्या कागदपत्रांचा डोंगर आणि 7 मजली इमारत;डोंबिवलीत बिल्डरच्या अटकेनंतर 100 कुटुंब संकटात )
 

सीसीटीव्हीमध्ये कैद झाला थरार

हॉटेल चालकाला मारहाण होत असताना तिथल्या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. हा सर्व प्रकार तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नशेखोर व्यक्ती हॉटेल चालकाला कशा पद्धतीने मारहाण करत आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता सोशल मीडियावर गुंडागिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

परिसरात नशेखोरांचा मोठा वावर

ज्या भागात ही घटना घडली, तिथे रात्रीच्या वेळी मद्यपान करणाऱ्या आणि नशा करणाऱ्या लोकांचा मोठा रास्त वावर असतो, अशी तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत. 

मेट्रो मॉल, नेतीबली आणि आनंद नगर या परिसरात रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सामान्य नागरिकांना, विशेषतः महिला आणि लहान मुलांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. या नशेखोरांमुळे परिसरात नेहमीच भीतीचे सावट असते.

Advertisement

सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

काही दिवसांपूर्वीच याच परिसरात नशेच्या अमलाखाली असलेल्या काही व्यक्तींनी अनेक घरांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या अशा गुन्हेगारी घटनांमुळे स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर आणि उपद्रव देणाऱ्या नशेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Topics mentioned in this article