Kalyan News : कल्याण पूर्व येथील चिंचपाडा परिसरात किडनी आजाराने ग्रस्त एका रुग्णाची आणि त्यांची पत्नीची फसवणूक झाल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय रुग्णालयात किडनी ट्रान्सप्लान सहज शक्य होत नाही, यासाठी मोठी प्रतीक्षा यादी असते. याचाच फायदा घेत खासगी रुग्णालयाकडून रुग्णाची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
छाया अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दीपाली चव्हाण यांच्या पतीला किडनी ट्रान्सप्लांटची गरज होती. यादरम्यान चिंचपाडा परिसरातील समर्थ रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि डॉक्टर गौरव नायर यांच्याशी भेट घडवून आणली. रुग्णाला विश्वास देण्यात आला की, किडनी ट्रान्सप्लांटसाठी डोनर उपलब्ध करून देण्यात येईल आणि शस्त्रक्रिया करून दिली जाईल. यासाठी त्यांनी रुग्णाकडून वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने सुमारे 32 लाख रुपये घेतले. मात्र प्रत्यक्षात ना किडनी ट्रान्सप्लांटची प्रक्रिया करण्यात आली, ना घेतलेले पैसे परत करण्यात आले. वारंवार विनंती करूनही पैसे परत न मिळाल्याने अखेर दीपाली चव्हाण यांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.
आरोपीच्या अटकेची मागणी
पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर डॉक्टर गौरव नायर, मौसमी विसवास, जयदेव विसवास, अभिषेक मन्ना, सुमनता पांडे, इकबाल सिद्दिकी आणि शोएब अंसारी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करून रुग्णाचे पैसे परत मिळवून द्यावेत आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.