Kalyan News : कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी 6 महिला आणि 1 पुरुष अशा एकूण 7 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 3 जणांकडे भारतीय आधार कार्ड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, यातील एक महिला यापूर्वी बांगलादेशात पाठवूनही पुन्हा 6 जणांना घेऊन भारतात परतल्याचे समोर आले आहे.
महात्मा फुले पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एका संशयित महिलेला ताब्यात घेतले. चौकशीत ती बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. तिने दिलेल्या माहितीनुसार, ती अंबरनाथमधील शिवाजीनगर परिसरात एका सोसायटीत राहत होती.
पोलिस अधिकारी स्वप्नील भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अंबरनाथमधील संबंधित सोसायटीवर छापा टाकला. या कारवाईत 5 महिला आणि 1 पुरुष असे एकूण 6 बांगलादेशी नागरिक सापडले. या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे.
तपासामध्ये धक्कादायक खुलासे
पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ताब्यात घेतलेल्या 7 पैकी 3 जणांकडे भारतीय आधार कार्ड सापडले आहे. यामुळे पोलिस या आधार कार्डची सत्यता तपासत आहेत. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधील चॅट ॲपमध्ये ‘+88' या बांगलादेशी कोड असलेल्या नंबरवरून चॅटिंग केल्याचे दिसून आले आहे.
( नक्की वाचा : KDMC Exam : नोकरभरतीसाठी आलेल्या 150 विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात, पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी )
या 7 आरोपींपैकी एक महिला सुमारे 7 महिन्यांपूर्वी पोलिसांनी पकडली होती. तिला बांगलादेशात पाठवण्यातही आले होते, मात्र ती पुन्हा भारतात आली. भारतात येताना तिने आणखी 6 बांगलादेशी नागरिकांना सोबत आणले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या आरोपींनी शिलाईचे काम केले असून, अद्याप तरी त्यांचा कोणत्याही गैरकृत्यात सहभाग आढळलेला नाही. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे
शिपा बलून पठाण (वय 27, रा. उत्तर कन्यायदेशी, जि. मल्लवी बाजार, बांगलादेश)
शर्मिन मोने रुल इस्लाम (वय 20, रा. बोरीसार, जि. पिरजपुर, बांगलादेश)
रीमा सागर अहमद (वय 29, रा. हरळी गाव, जि. ढाका, बांगलादेश)
सुमया अबुल कासिम (वय 20, रा. नवागाव, जि. नांदगंज, बांगलादेश)
पौर्णिमा मोहम्मद सुलेमान अख्तर (वय 19, रा. ग्रामपंचायत, जि. फेनी, बांगलादेश)
जोया जास्मिन मतदार (रा. गाजीपुर, जि. ढाका, बांगलादेश)
रॉकी रहीम बादशाह (रा. बांगलादेश)