Kalyan News: रुग्णवाहिकेला जागा द्या म्हटल्याने सुरक्षा रक्षकाला फोडलं; कल्याणमधील संतापजनक प्रकार

Kalyan News: कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan News: कल्याणमध्ये कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली आहे.

Kalyan News: कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र धावणाऱ्या रुग्णवाहिकेचा मार्ग अडवणाऱ्या कार चालकाला जेव्हा सुरक्षा रक्षकाने हटकले, तेव्हा त्या मुजोर चालकाने सुरक्षा रक्षकावरच जीवघेणा हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

कल्याण येथील महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेहमीच रुग्णांची मोठी वर्दळ असते. या रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एक चारचाकी चालक आपल्या गाडीत रुग्ण घेऊन आला होता. त्याने रुग्णाला उतरवल्यानंतर गाडी पार्किंगमध्ये नेण्याऐजी थेट रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच उभी केली. 

Advertisement

या कारमुळे रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहनांना आत येण्यास आणि बाहेर जाण्यास मोठा अडथळा निर्माण होत होता. ही बाब लक्षात येताच तिथे तैनात असलेले सुरक्षा रक्षक लोटे यांनी चालकाला गाडी बाजूला घेण्याची विनंती केली.

( नक्की वाचा : Pune News: आई-वडिलांचं मौन मुलीच्या जीवावर बेतलं; पुण्यात 18 वर्षांच्या श्रुतीचा भयंकर शेवट ! नेमकं काय घडलं? )

सुरक्षा रक्षकाला रॉडने बेदम मारहाण

गाडी हटवण्यास सांगितल्याचा राग मनात धरून कार चालकाने सुरक्षा रक्षकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्याने उलट सुरक्षा रक्षकालाच गाडी पार्क करण्याचे आदेश दिले. लोटे यांनी जेव्हा त्याला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या मुजोर चालकाने गाडीतून खाली उतरून त्यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. 

एवढ्यावरच न थांबता या चालकाने त्याच्या गाडीतून लोखंडी रॉड काढला आणि सुरक्षा रक्षकावर हल्ला चढवला. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

( नक्की वाचा : Yavatmal News: रात्री 2 वाजता नवरा ओरडला आणि बायकोचा भयंकर प्लॅन फसला; प्रियकरासोबत मिळून रचला होता कट )

संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

ही सर्व संतापजनक घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, कशाप्रकारे हा चालक सुरक्षा रक्षकाला अमानुषपणे मारहाण करत आहे. या हल्ल्यानंतर रुग्णालय परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याला अशा प्रकारे मारहाण झाल्यामुळे रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांमध्येही तीव्र नाराजी पसरली आहे.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या मुजोर कार चालकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी संबंधित कारचा क्रमांक मिळवला असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. रुग्णालय परिसरात अशा प्रकारे गुंडगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Topics mentioned in this article