अमजद खान, प्रतिनिधी
दाखविण्यासाठी फेरीवाल्याचा धंदा मात्र खरा धंदा लूटीचा असा एक प्रकार कल्याण स्टेशन परिसरात दिवसाढवळ्या घडला आहे. हा प्रकार पाहून पोलिस देखील हैराण आहेत. कल्याण स्टेशन परिसरात स्कायवॉक वर सामान विक्रीचा धंदा करणाऱ्या एका फेरीवाल्याने स्कायवॉकवरुन जाणाऱ्या एका तरुणाला जाणीवपूर्वक धक्का दिला. त्याच्याशी वाद घालून त्याला मारहाण केली. त्यांच्याजवळचा महागडा मोबाईल घेऊन पसार झाला. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या फेरीवाला लूटारुला अटक केली आहे. राकेश यादव असे या चोरट्याचे नाव आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
कल्याण पोलिसांकडून स्टेशन परिसरात आणि स्कायवॉक फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी वारंवार महापालिकेला पत्र व्यवहार केला जातो. बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात देखील कारवाई करण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक नियंत्रण पोलिस शाखेलाही पत्र व्यवहार केला जाताे. स्कायवॉक वर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा नागरीक आणि पादचारी, प्रवासी यांना प्रचंड त्रास होतो. हे फेरीवाले दादागिरी करतात. मारहाण करतात. महिलांची छेड काढतात. आत्ता तर कहरच झाला आहे.
एका फेरीवाल्याने चक्क एका तरुणाला लूटले आहे. नाशिक येथील पंचवटी परिसरातील तरुण विक्रम शेलार हा तरुण त्याच्या मित्राला भेटण्याकरीता कल्याणला आला होता. तो त्याच्या मित्राला भेटण्याकरीता स्कायवॉकवरुन कल्याण पश्चिमेच्या दिशेने जात असताना समोर एक व्यक्ती आला. त्याने जाणीवपूर्वक धक्का दिला. त्यानंतर त्याच्याशी वाद घातला. त्याच्याकडचा आयफोन घेऊन पसार झाला.
( नक्की वाचा : कल्याणच्या एसी मेकॅनिकनं चोरली रिक्षा, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात! कारण ऐकून सर्वांना धक्का )
महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी दोन तासाच्या आत विक्रमला लूटणाऱ्या तरुणाला शाेधून काढले. त्याचे नाव राकेश यादव आहे. तो स्टेशन परिसरात फेरीचा धंदा करतो. राकेश यादवला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने चोरलेला महागडा मोबाईहली हस्तगत केला आहे. महात्मा फुले पोलिसांकडून या फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई केली जाते. महापालिका ठोस कारवाई करीत नाही. तोपर्यंत फेरीवाल्यांची गुंडागिरी सुरुच राहणार, अशी भावना कल्याणकर व्यक्त करत आहेत. त्यामुळे महापालिका फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.