अमजद खान, प्रतिनिधी,
KDMC News :कल्याण डोंबिवलीमधील आरोग्य व्यवस्थेचं आणखी एक विदारक उदाहरण समोर आलं आहे. केडीएमसीच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेला पाच तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने सिविता बिरादर या महिलेचा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रुग्णालयात प्रशासनाने रुग्णवाहिकेस येण्यास उशीर झाल्याची कबूली दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या प्रकरणात संबंधितांच्या विरोधात कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत महिलेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमीका महिलेच्या नातेवाईकांनी घेतली आहे. काही दिवसापूर्वी डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातएका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कल्याण पू्र्वेतील महापालिकेच्या प्रसूती गृहात महिलचा मृत्यू झाला होता. ही घटना घडल्यानं नागरिकांमध्ये संतप्त वातावरण आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आणि अन्य कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तुमचा दवाखाना आहे की कत्तलखाना? असा सवाल उपस्थित करीत संबंधितांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, भाजपानं केली आहे.
( नक्की वाचा : तरुणाशी Instagram वर मैत्री, घरी भेटायला बोलवलं आणि लिंग बदललं! धक्कादायक प्रकारामुळे पोलीसही हादरले )
काय आहे प्रकरण?
कल्याण पूर्वेतील सविता बिरादार या जीन्स कंपनीत शिलाईचं काम करणाऱ्या महिलेचा वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यानं मृत्यू झाला आहे. सविता यांच्या पतीचं यापूर्वीच निधन झालंय. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्या शिलाई काम करुन कुटुंबाचा चरितार्थ चालवत होत्या. पण, त्यांचा मृत्यू झाल्यानं या मुलांवर आता आभाळ कोसळलं आहे.
सविता यांची तब्येत आज (सोमवार, 5 मे) खराब झाली होती. त्यांच्या हाताला आणि पायाला जड वाटू लागले. त्यावेळी त्यांना घरच्यांनी उपचारासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात दुपारी एक वाजता आणले होते. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. पुढील उपचारासाठी कळवा येथील सरकारी रुग्णलयात नेण्याचा सल्ला दिला गेला. तिच्या कुटुंबियांनी तिला कळवा येथे नेण्यासाठी तयारी दर्शविली. मात्र त्यांना कळव्याला हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती.
( नक्की वाचा : 13 वर्षांच्या मुलासोबत पळालेली शिक्षिका अखेर सापडली, पोलिसांना म्हणाली मी गर्भवती, माझ्या पोटात... )
त्यांनी 108 क्रमांकावर संपर्क साधला. मात्र त्या रुग्णवाहिका चालकाने येतो असे सांगितले. त्याला विलंब झाला. महापालिकेची रुग्णवाहिका आली. त्या रुग्णवाहिकेच्या चालकाने एकच रुग्ण कळव्याला घेऊन जाणार नाही असे सांगत महिलेला उपचारासाठी कळवा रुग्णालयात नेण्यास नकार दिला. रुग्णवाहिका वेळवर उपलब्ध न झाल्याने अखेरीस महिलेचा पाच वाजता रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच मृत्यू झाला.
या प्रकरणी हॉस्पिटलचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पगारे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नाही. हे मान्य केले आहे.