Karjat News : खेळता खेळता चिमुरड्याचा मृत्यू, 5 दिवसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला अन् भयाण प्रकार समोर

गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी मुलाचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदन करण्यात आले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Karjat Crime : कर्जतमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेजारी राहणाऱ्या एका महिलेने अडीच वर्षाच्या चिमुरड्याची गळा आवळून हत्या केली. सुरुवातील या चिमुरड्याचा नैसर्गिक मृत्यू असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र एका गुप्त माहितीनंतर, पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि बाळाच्या शवविच्छेदनात गंभीर कारण समोर आलं आहे. 

महिलेने शेजारच्या चिमुरड्याला का मारलं? 

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरकुलवाडी या भागात हा प्रकार घडला. आरोपी जयवंता गुरुनाथ मुकणे हिला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. जयवंता हिने स्वत: हत्येची कबुली दिली. जयदीप गणेश वाघ असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. जयदीप याचे वडील गणेश वाघ आणि पत्नी पुष्पा हे दोघे ९ नोव्हेंबरला मजुरीसाठी गेले होते. त्यांची दोन्ही मुलं घरासमोर खेळत होती. त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या जयवंता हिने जयदीपला उचलून घराच्या मागे नेलं आणि गळा आवळून त्याची हत्या केली. यानंतर मुलगा बेशुद्ध झाल्याचं नाटक करीत नैसर्गिक मृत्यू झाल्याचा आभास निर्माण केला. रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर कुटुंबाने त्याच्यावर अंत्यसंस्कारही केले. मात्र एका नागरिकाने पोलिसांना गुप्त माहिती दिल्यानंतर भयंकर प्रकार उघडकीस आला. जयवंता हिनेही आपला गुन्हा मान्य केला आहे. शेजारची मुलं माझ्या मुलांना मारतात म्हणून मी त्याला मारलं अशी धक्कादायक कबुली जयवंता हिने दिली आहे.

नक्की वाचा - Dombivli News : गर्लफ्रेंड्च्या पैशांवर एैश, 36 लाखांचं सोनं, 1 कोटीच्या BMW चा मालक; अखेर पोलिसांचा दणका

शवविच्छेदनासाठी मृतदेह बाहेर काढला...

गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी मुलाचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये मुलाची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं. धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या आदल्या दिवशी जयवंताने चिमुरड्याच्या ४ वर्षांच्या मोठ्या बहिणीलाही मारण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न फसला आणि दुसऱ्या दिवशी तिने अडीच वर्षांच्या जयदीपची अत्यंत निघृणपणे हत्या केली. 

Advertisement