विशाल पुजारी, प्रतिनिधी
भाचीचं लग्न हा मामासाठी आनंदाचा सोहळा असतो. अगदी लग्न सोहळ्यातही विधींमध्ये मामाचा सहभाग करून घ्यावा लागतो. मात्र कोल्हापुरातील एका मामाने आपल्या भाचीचं लग्न उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. या मामाने भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात विषारी औषध टाकून सर्वांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोल्हापुरच्या पन्हाळा तालुक्यातील उत्रे भागातील घटना आहे. भाचीने आठवड्याभरापूर्वी आपल्या मर्जी विरोधात गावातील मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याने बदनामीच्या रागातून मामाचे हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. महेश जोतीराम पाटील असं मामाचं नाव आहे. या प्रकरणात पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
नक्की वाचा - Dadar News : अचानक आला अन् तरुणीचे केस कापून फरार; दादर स्थानकावर भरगर्दीत नेमकं काय घडलं?
लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात विषारी औषध टाकून पाहुण्यांच्या जीवाला धोका पोहोचण्यापूर्वी सुदैवाने हा प्रकार उघडकीस आला. जेवणात विषारी औषध टाकताना मामा आणि आचाऱ्याची झटापट झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. आचाऱ्याच्या समोरच अन्नामध्ये विषारी औषध टाकल्याचा प्रकार घडल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.
दरम्यान उत्रे गावातील एका तरूणाशी तिचं प्रेम जुळलं. मामाचा लग्नाला विरोध असल्याने भाचीने आठवड्यापूर्वी पळून जाऊन लग्न केलं होतं. त्यानंतर नवऱ्या मुलांकडील मंडळींनी मंगळवारी गावातील एका हॉलमध्ये लग्नाच्या स्वागत सभारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच लग्नानंतर उत्रे गावात नवरदेवाच्या कुटुंबीयांकडून फटाक्यांची आतषबाजी झाल्याने मामाच्या संतापात भर पडली. त्यानंतर आयोजित केलेल्या लग्न समारंभात मामाने सर्वांना मारण्याचा प्रयत्न करीत जेवणात विषारी औषध टाकलं.