राकेश गुडेकर, प्रतिनिधी
Konkan Crime News : सध्या राज्यभरात गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साह पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने लोक मुंबई, पुण्याहून कोकणात रवाना झाले आहेत. दरम्यान कोकणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील आंबा घाटातून एका (Girl Killed in Amba Ghat) तरुणीचा मृतदेह सापडला आहे. भक्ती जितेंद्र मयेकर असं या तरुणीचं नाव असल्याचं उघड झालं आहे. तिच्या प्रियकरानेच ही हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे गावातून गेल्या दोन आठवड्यांपासून भक्ती जितेंद्र मयेकर ही तरुणी बेपत्ता झाली होती. तरुणीचा प्रियकरानेच खून केल्याचं उघड झालं आहे. संशयित प्रियकर असलेल्या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीत त्याने खंडाळा येथे तिचा खून करून आंबा घाटात निर्जन ठिकाणी नेऊन मृतदेह फेकून दिला होता. शनिवारी सायंकाळी मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर दुर्वास दर्शन पाटील याच्यासह विश्वास विजय पवार, सुशांत शांताराम नरळकर यांना संशयित म्हणून ताब्यात घेतलं आहे. हे तिघेही रत्नागिरीतल्या खंडाळा येथील आहेत.
नक्की वाचा - Titwala : इन्स्टाग्रामवरील ओळख ठरली जीवघेणी; टिटवाळ्याच्या तरुणीनं व्हिडिओ कॉल करत संपवलं आयुष्य
भक्ती मयेकर ही तरुणी १७ ऑगस्ट रोजी घरातून मैत्रिणीकडे जाते, असे सांगून निघून गेली होती. तेव्हापासून ती घरी परतली नव्हती. तिचा मोबाइलही बंद लागत असल्याने कुटुंबीयांनी रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दिली होती. पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने भक्तीचा शोध सुरू केला. भक्तीचे बेपत्ता होण्यापूर्वीचे मोबाईल लोकेशन काढण्यात आले. १६ ऑगस्टला भक्ती खंडाळा येथे गेल्याचे निष्पन्न झाले. भक्ती ज्याच्याशी वारंवार बोलत असे तो तिचा प्रियकर खंडाळा येथेच राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्या तरुणीचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर काल सायंकाळी तिचा मृतदेह आंबा घाटातून शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळालं.