देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत एक बस तब्बल 50 हून अधिक पादचाऱ्यांना चिरडून जाते आणि यात काहीही संबंध नसताना 7 जीवांचा हकनाक बळी जातो. कुर्ल्यातील बस अपघाताने अनेक सवाल उपस्थित केले आहेत. कुर्ला परिसरातील अतिशय चिंचोळे रस्ते, हफ्ता वसुली, फेरीवाल्यांनी वाढती संख्या, बेकायदेशीर पार्किंग, सरकारचं दुर्लक्ष यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
नक्की वाचा - बसमध्ये बिघाड नाही, चालकानं मद्यपान केलं नव्हतं; कुर्ला डेपोजवळच सुरू झालं होतं अपघाताचं सत्र?
या सर्व गोष्टींची शिक्षा त्या सात जणांना जीव गमावून द्यावी लागली. या घटनेत कुर्ल्यात राहणाऱ्या 20 वर्षीय आफरीन शाहाचा दुर्देवी मृत्यू झाला. ऑफिसचा पहिला दिवस तिच्यासाठी शेवटचा ठरला.
सोमवारी आफरीन शाह सकाळी 9 वाजता ऑफिसला जायला निघाली होती. ऑफिसचा पहिला दिवस होता, त्यामुळे ती आनंदात होती. स्वत:च्या पायावर उभी राहण्याचा वेगळाच आनंद होता. दिवसभर नवं ऑफिस आणि नवी ऊर्जा घेऊन ती रात्री कुर्ला स्थानकावर परतली. मात्र इतरांप्रमाणे तिला इथून घरापर्यंत रिक्षा मिळेना. रिक्षावाल्यांची मुजोरी आणि अव्वाच्या सव्वा पैसे आकारणारे रिक्षावाले हा कुर्ल्यातील आणखी एक समस्या. रिक्षा मिळत नसल्याचं लक्षात आल्यावर तिने घरी फोन केला आणि अब्बुला सांगितलं.
नक्की वाचा - CCTV Footage : कुर्ल्यात भरधाव बेस्ट बस गर्दीत शिरली, 7 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी
तिचे वडील अब्दुल सलीम शाह यांनी तिला त्या रस्त्यांनी पुढे येण्यास सांगितलं. ते रात्री साधारण 9.09 च्या दरम्यान ते लेकीशी फोनवर शेवटचं बोलले. त्यानंतर साधारण 9.54 वाजता आफरीनच्या फोनवरुन एक कॉल आला आणि समोरून भाभा रुग्णालयातील एक कर्मचारी बोलत होता. रस्त्यावर चालणे ही तिची चूक होती का? असा सवाल तिच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.
कुर्ल्यातील ही घटना मन सुन्न करणारी आहे. आफरीनप्रमाणे आणखी सहा जणांचा या अपघातात हकनाक बळी गेला. तर कित्येक जण रुग्णालयात संघर्ष करीत आहेत.