त्रिशरण मोहगावकर, प्रतिनिधी
Latur domestic violence case : लातूर जिल्ह्याला हादरवणाऱ्या घटनेत विवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेनं तिच्या नवऱ्याला मैत्रिणीला फिरायला का घेऊन गेलास? असा जाब विचारला होता. त्यानंतर तिचा पती, मैत्रिण, सासून आणि दीर या चौघांनी संगनमत केलं. त्यांनी विवाहित महिलेवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. 24 जुलैला हा प्रकार घडला होता. त्यामध्ये ती महिला 70 टक्के जळाली होती. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरु होते. पण, या महिलीचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला आहे.
काय आहे प्रकरण?
लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील पानगावमधील हे प्रकरण आहे. येथील विवाहित महिला फातिमा तोफिक कुरेशी (वय 25) हिने पती तोफीक कुरेशीला तू माझ्या मैत्रिणीला फिरायला का घेऊन गेलास? असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे संतापलेल्या तोफिकनं पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकले. तौफिकची मैत्रिण हिना पठाणनं काडी ओढून तिला पेटवून दिले.
( नक्की वाचा : पत्नीनं रचला पतीच्या हत्येचा कट, भावांनी गुंडांना सुपारी दिली पण शेवटच्या क्षणी जबरदस्त ट्विस्ट! )
एवढ्यावरच न थांबता, सासूने घरातील दार बंद केले, तर दिराने बाहेरून दाराला कडी लावली, असे गंभीर आरोप पीडितेने तिच्या जबानीमध्ये केले होते. 24 जुलै रोजी झालेल्या प्रकारात फातिमा कुरेशीचा चेहरा, पाठ, दोन्ही हात आणि दोन्ही पाय भाजले होते. तिच्यावर लातूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होता.
या उपचाराच्या दरम्यान फातिमाचा गुरुवारी मृत्यू झाला. फातिमावर तिच्या माहेरी बोरी गावामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणातील आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अरोपी पती तोफीक कुरेशी पोलीसांच्या ताब्यात असून त्याची मैत्रिण भाऊ आणि त्याची आई फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथकं रवाना केली असल्याची माहिती तपास अधिकारी चौधरी यांनी दिली आहे.