विष्णू बुर्गे, प्रतिनिधी
Latur News : देशभरात चर्चेत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणामुळे लातूरमधील खासगी कोचिंग क्षेत्र पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर आरसीसी क्लासेसचे शिवराज मोटेगावकर सातत्याने चर्चेत आहेत. सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासासोबतच आता मोटेगावकर यांचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामधील वक्तव्यांवरून नवे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये शिवराज मोटेगावकर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. यामध्ये ते पिझ्झा हे डुक्कर आणि कुत्र्याचं खाद्य असल्याचा दावा करताना दिसत आहेत. तसेच सलग वीस दिवस पाणीपुरी खाल्ल्यास दोन्ही किडन्या फेल होतात, असं सायन्स सांगत असल्याचंही ते विद्यार्थ्यांसमोर बोलताना ऐकू येत आहे. एवढंच नाही तर पाणीपुरी खाणाऱ्यांनी मागच्या जन्मी आपण भिकारी होतो असं समजावं, असं वक्तव्यही त्यांनी केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
मोटेगावकर याचे जुने व्हिडिओ पुन्हा समोर...
या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. एक शिक्षक आणि कोचिंग क्लास चालक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अशा प्रकारची भाषा आणि दावे करणे कितपत योग्य आहे, असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे लातूर पॅटर्नमुळे राज्यभरातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरमध्ये येतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांवर शिक्षकांच्या बोलण्याचा मानसिक आणि सामाजिक परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
नीट परीक्षेच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी कोचिंग क्लासेसवर अवलंबून असतात. अनेक विद्यार्थी आणि पालक शिक्षकांवर विश्वास ठेवून त्यांचे मार्गदर्शन स्वीकारत असतात. त्यामुळे सार्वजनिक व्यासपीठावर किंवा वर्गात बोलताना शिक्षकांनी वैज्ञानिक माहिती, सामाजिक भान आणि जबाबदारी जपणे अपेक्षित असते, अशी भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू असून लातूरमध्ये सलग अनेक दिवस विविध ठिकाणी चौकशी आणि सर्च ऑपरेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मोटेगावकर याचे जुने व्हिडिओ पुन्हा समोर येत असल्याने हे प्रकरण आणखी चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओंमुळे आता मोटेगावकर नेमकं विद्यार्थ्यांना काय शिकवत होते, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे.