जाहिरात

NEET पेपर फुटीमुळे लातूरमधील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण; विद्यार्थ्यांमध्ये भीती, नैराश्य अन् मानसिक तणाव

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर उमटताना दिसत आहेत.

NEET पेपर फुटीमुळे लातूरमधील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण; विद्यार्थ्यांमध्ये भीती, नैराश्य अन् मानसिक तणाव

विष्णू बुर्गे, प्रतिनिधी

Latur News : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर उमटताना दिसत आहेत. लातूर जिल्ह्यातील गोंदेगांव गावातील नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये परीक्षेवरील तणाव आणि नीट पेपरफुटी प्रकरणानंतर निर्माण झालेल्या मानसिक दबावाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. या घटनेमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

परीक्षा रद्द झाल्याने मानसिक तणाव...

कुटुंबीयांच्या माहितीनुसार संबंधित विद्यार्थिनी अभ्यासात अत्यंत हुशार होती. यावर्षी तिने नीट परीक्षा दिली होती आणि डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते. तिची मोठी बहीण इंजिनिअर असून, त्याचप्रमाणे स्वतःही वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ती सातत्याने मेहनत घेत होती. तिने केवळ नीटच नव्हे तर सीईटीसारख्या इतर प्रवेश परीक्षाही दिल्या होत्या. परीक्षेची तयारी करण्यासाठी ती अनेक महिन्यांपासून तणावपूर्ण दिनचर्येमध्ये राहत होती. मात्र नीट पेपरफुटी प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि त्यानंतर परीक्षा रद्द झाल्याने ती मानसिक तणावाखाली गेल्याचे कुटुंबीयांनी जबाबात म्हटले आहे.

नक्की वाचा - फुलांचा हार अन् पिशवीच्या आडून लाखोंची चोरी; माऊलींच्या दानपेटी चोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

विशेष म्हणजे, या प्रकरणात लातूरमधील आरसीसी कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांचे नाव समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली. सीबीआय चौकशी, धाडी आणि अटक कारवाईनंतर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अनेक विद्यार्थी आणि पालकांनी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन परीक्षा दिल्यानंतरही प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. पेपरफुटी, रद्द परीक्षा, चौकशी आणि सततच्या चर्चांमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि असुरक्षितता वाढल्याचे चित्र दिसत आहे.

शेतातील लिंबाच्या झाडाला घेतला गळफास...

दरम्यान, संबंधित विद्यार्थिनीने शेतातील लिंबाच्या झाडाला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात कोणावरही संशय किंवा तक्रार नसल्याचेही कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे. मात्र या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ गुणांची लढाई नसून त्यामागे प्रचंड मानसिक दबाव, अपेक्षा आणि भविष्याची चिंता दडलेली असते. अशा परिस्थितीत पेपरफुटीसारख्या घटनांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन ढासळत असल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केवळ अभ्यास पुरेसा नसून समुपदेशन, भावनिक आधार आणि मानसिक आरोग्याबाबत जागरूकता आवश्यक आहे. लातूरसारख्या शिक्षणाच्या केंद्रामध्ये हजारो विद्यार्थी डॉक्टर आणि इंजिनिअर होण्याची स्वप्ने घेऊन येतात. मात्र वाढती स्पर्धा, निकालांचा दबाव आणि पेपरफुटीसारख्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर गंभीर परिणाम होत असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com