रस्त्यावर रक्ताने माखलेली प्रेयसी, तिच्यासमोर शस्त्र घेऊन बसलेला प्रियकर आणि आरोपीला पकडण्यासाठी दूर उभे असलेले पोलीस… हे थरारक दृश्य मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील होते. प्रियकराने शुक्रवारी दिवसाढवळ्या आपल्या प्रेयसीच्या छातीत आणि शरीरावर 4 ते 5 गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो मृतदेहासमोर बसून शस्त्र नाचवत होता. आरोपी पोलिसांपासून काही अंतरावर होता. पण त्याला पकडण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. या हत्येचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
ग्वाल्हेरच्या व्हीआयपी परिसरात असलेल्या रूपसिंग स्टेडियमसमोर घडलेल्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सांगितले की, प्रियकराने प्रेयसीवर 4-5 गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेमुळे घटनास्थळी एकच धांदल उडाली. लिव्ह-इन पार्टनरला गोळ्या घातल्यानंतर आरोपी प्रियकर युवतीसमोर बसून शस्त्र नाचवत राहिला. जेव्हा पोलीस पोहोचले, तेव्हा त्याने त्यांनाही गोळ्या घालण्याची धमकी दिली.
पोलिसांनी शरण येण्याचे आव्हान दिले
त्यानंतर पोलिसांनी चहूबाजूने वेढा घालून आरोपीला आत्मसमर्पण करण्याचे आव्हान दिले. पण तो तिथून हटला नाही. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस बराच वेळ दूर उभे राहिले. आजूबाजूचे लोक हे दृश्य पाहत होते. पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितले, पण त्याने ऐकले नाही. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले. संधी साधून काही पोलीस कर्मचारी आणि आसपासच्या लोकांनी त्याला पकडले आणि त्याला मारहाण केली.
दोघांचे ही झाले होते लग्न
जेव्हा पोलिसांनी आरोपीला पकडले, तेव्हा कुठे जाऊन ते महिलेपर्यंत पोहोचले. रक्ताने माखलेल्या अवस्थेत तिला पोलिसांच्या गाडीत बसवून रुग्णालयात पोहोचवण्यात आले. पोलीस सांगतात की, आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. या घटनेमागील कारण अद्याप कळलेले नाही. प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि युवतीचे आपसात प्रेम संबंध होते. दोघेही विवाहित होते. पण त्यांचे लग्न वेगवेगळ्या व्यक्तींशी झाले होते. लग्न झाल्यानंतर ते दोघे दीड वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहत होते.