Jayaraj Bennicks Custodial Death Verdict : बाप आणि लेकाला पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून त्यांचा जीव घेणाऱ्या 9 पोलिसांना अखेर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खाकी वर्दीचा गैरवापर करून करण्यात आलेल्या या क्रूर कृत्याने 6 वर्षांपूर्वी संपूर्ण देश हादरला होता. सत्तेच्या नशेत केलेल्या या कृत्यासाठी न्यायालयाने या पोलिसांना सर्वोच्च शिक्षा दिली असून, हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
हे भीषण हत्याकांड तामिळनाडू राज्यातील मदुराई जिल्ह्यात घडले आहे. मदुराई न्यायालयाने सोमवारी थुथुकुडी जिल्ह्यातील व्यापारी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात हा ऐतिहासिक निकाल दिला. दोषी ठरवण्यात आलेल्यांमध्ये इन्स्पेक्टर श्रीधर, सब-इन्स्पेक्टर बाळकृष्णन, रघू गणेश आणि इतर 6 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
( नक्की वाचा : Chandrapur News: चंद्रपुरात क्रिकेट स्पर्धेत मृत्यूचे तांडव ! मॅच सोडून जीव वाचवण्यासाठी पळत सुटले प्रेक्षक )
कोर्टानं निकाल देताना काय सांगितलं?
न्यायालयाने निकाल देताना अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढले. बाप आणि मुलाला एकमेकांसमोर विवस्त्र करून ज्या निर्दयीपणे मारहाण करण्यात आली, ते वाचूनही हृदयाचा थरकाप उडतो, असे कोर्टाने स्पष्ट केले.
सरकारी तिजोरीतून पगार घेणारे अधिकारी कामाचा ताण असल्याचे कारण देऊन असा अमानुष छळ करू शकत नाहीत, असेही न्यायालयाने ठणकावून सांगितले. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या प्रकरणावर सतत देखरेख ठेवली नसती, तर सत्य कधीच समोर आले नसते, असेही कोर्टाला वाटले.
( नक्की वाचा : माहेरच्यांनी 22 वर्षे ऐकला नाही आवाज! फरार कल्पना खरातच्या भावाचा आणि वडिलांचा दुर्दैवी अंत; पाहा वास्तव )
कधी घडली होती घटना?
ही घटना 19 जून 2020 रोजी लॉकडाऊनच्या काळात घडली होती. जयराज आणि बेनिक्स यांचे मोबाईलचे दुकान होते. त्यांनी नियमापेक्षा जास्त वेळ दुकान उघडे ठेवल्याचा खोटा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यांना साथनकुलम पोलीस ठाण्यात नेऊन रात्रभर लाठ्यांनी आणि शस्त्रांनी बेदम मारहाण करण्यात आली.
या छळामुळे दोघांचाही काही दिवसांतच मृत्यू झाला. नातेवाईकांनी आरोप केला होता की, पोलीस कोठडीत त्यांच्यावर इतके अत्याचार झाले होते की त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.
सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला आणि 10 पोलिसांना अटक केली होती, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. एका महिला कॉन्स्टेबलची साक्ष या केसमध्ये सर्वात महत्त्वाची ठरली, जिने पोलीस ठाण्यातील टेबलावर आणि लाठ्यांवर रक्ताचे डाग पाहिले होते. या केसमध्ये 100 पेक्षा जास्त साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आणि अखेर 5 वर्षांनंतर या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world