- मेहबूब जमादार, प्रतिनिधी
Raigad News: रायगड जिल्ह्यात माणुसकीला आणि गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. महाड येथील एका नामवंत खासगी शिकवणीच्या शिक्षकाने आपल्याच अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण जिल्ह्यात या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना महाडमधील एका खासगी क्लासेसमध्ये घडलीय. या क्लासचा मालक आणि शिक्षक सुनील गांधीवर इयत्ता दहावीत शिकणाऱ्या पीडित विद्यार्थ्याने गंभीर आरोप केले आहेत. तक्रारीनुसार 2024-25 या शैक्षणिक वर्षादरम्यान आरोपी शिक्षकाने या विद्यार्थ्याला आपल्या क्लासच्या वरील बाजूस असलेल्या बेडरूममध्ये नेले. तिथे शिक्षकाने विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे केले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला.
(नक्की वाचा: Vasai News: 15 दिवसांत 6 मृतदेह; विरारमध्ये आणखी एक मृतदेह आढळल्याने खळबळ)
पोलिसांत तक्रार दाखल
पीडित मुलाने या अत्याचाराबाबत धाडस दाखवून माहिती दिल्यानंतर महाड शहर पोलीस ठाण्यात सुनील गांधीविरोधात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.
(नक्की वाचा: Nagpur Crime: 'मी तुमच्यावर प्रेम करते', चिठ्ठी लिहून गळ्याला दोर लावला, माहेरी आलेल्या विवाहितेचे टोकाचे पाऊल)
24 तासांतील दुसरी घटनारायगड जिल्ह्यासाठी ही चिंतेची बाब ठरत आहे, कारण महिला आणि बाल अत्याचाराची गेल्या 24 तासांतील ही दुसरी घटना आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारचे कृत्य घडल्याने पालकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.