Maharashtra-Karnataka language dispute : महाराष्ट्र-कर्नाटकातील भाषा वादात नवा ट्विस्ट आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर कर्नाटकातील बस कंडक्टर विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, या मुलीच्या कुटुंबीयांनी केस मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या कुटुंबीयांनी एक व्हिडिओ शेअर करीत केस मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासह सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक भाषा वाद थांबविण्याची विनंती केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आतापर्यंत चार जणांना अटक
महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या बेळगावच्या हद्दीत शुक्रवारी ही घटना घडली. 51 वर्षीय बस कंडक्टर महादेवप्पा मल्लप्पा हुक्केरी यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार, एक अल्पवयीन मुलगी आपल्या मित्रासोबत या बसमध्ये चढली होती. ही तरुणी बस कंडक्टरशी मराठीत बोलत होती. मात्र कंडक्टरला मराठी येत नसल्याने त्याने तिला कन्नडमध्ये बोलण्यास सांगितलं. यावरुन प्रकरण तापलं. याशिवाय मराठी येत नसल्याच्या कारणावरुन बस कंडक्टरला मारहाण झाल्याची माहिती आहे. यानंतर मुलीने बस कंडक्टरविरोधात तक्रार दाखल केली आणि कंडक्टरने गैरव्यवहार केल्याचं तक्रारीत नमूक केलं. या तक्रारीच्या आधारवर कंडक्टरविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय बस कंडक्टरवर हल्ल करणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली आहे.
यानंतर या वादाने वेगळंच वळण घेतलं आणि महाराष्ट्र-कर्नाटकातील भाषा वाद उफाळून आला. कर्नाटक सीमेवर गेलेल्या महाराष्ट्रातील बसवर हल्ला करण्यात आला. यानंतर महाराष्ट्रातील कर्नाटक बसवर काळं फासण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. शेवटी महाराष्ट्रातील कोणत्याही बस सेवा कर्नाटकात जाण्यास बंदी घालण्यात आली. शनिवारी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली.
पीडितेच्या कुटुंबीयांकडून व्हिडिओ प्रसिद्ध...
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाढत्या वादानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केल्याची माहिती आहे. या प्रकरणाला चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्र-कर्नाटक भाषा वादाचा अँगल दिला जात आहे. जो चुकीचा आहे. या प्रकरणामुळे दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. आम्ही कन्नड किंवा मराठीमध्ये भेद करीत नाही. त्यामुळे बस कंडक्टरविरोधातील तक्रार मागे घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.