Badlapur News : बदलापूर येथील भाजप शहराध्यक्ष यांच्या मुलीने देवतांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं असून या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून बदलापूर पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेत पोलीस तपास सुरू केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध योग्य त्या कायदेशीर कलमांनुसार गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे उद्धव ठाकरे गटाकडून तक्रार अर्ज दाखल करण्यात आली आहे.
आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मुलीच्या आईचा राजीनामा...
बदलापुरातही अनेक हिंदूत्ववादी संघटनांनी बदलापूर पोलीस स्टेशनबाहेर गर्दी केली होती. मुलीवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान या प्रकरणात भाजप महिला शहराध्यक्ष प्रतिभा जाधव यांनी माफी मागितली असून नैतिक जबाबदारी स्वीकारत भारतीय जनता पक्षाच्या महिला शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भाजप नेते महेश जाधव आणि भाजप महिला बदलापूर शहराध्यक्ष प्रतिभा महेश जाधव हे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मुलीचे आई-वडील आहे.
राज्यभरातून संतापाची लाट उसळल्यानंतर महेश जाधव आणि प्रतिभा जाधव यांनी लोकल माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दोघांनाही रडू कोसळलं होतं. आम्ही शहरातील प्रत्येक हिंदू सणात हिरहिरीने सहभागी होतो, आमच्या घरातही देव्हारा असून नियमित पूजा-अर्चा करीत असल्याचं दोघांनी लोकल माध्यमांशी बोलताना सांगितलं. याशिवाय यावेळी भाजप महिला बदलापूर पूर्व शहराध्यक्ष प्रतिभा महेश जाधव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं.