अमजद खान, कल्याण
अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरी येथील अंबर चौकात एका 25 वर्ष तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. सचिन भोसले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून जावसई गाव परिसरात तो राहत होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सचिन हा विप्रो कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. रात्री 10 च्या दरम्यान सचिन याला फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याला बोलावून घेतले. मी एका कामाला चाललोय लवकरच घरी येतो, असे सांगून सचिन निघून गेला. मात्र रात्री साडेबारापर्यंत तो घरी आला नाही. काही अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास अंबर चौकात गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.
(नक्की वाचा - मांडव सजला, वऱ्हाडी जमले; मात्र लग्नाआधी नवरीची पार्लरमध्ये गोळ्या झाडून हत्या)
अंबरनाथ पोलिसांनी सचिन भोसले यांचे शव पोस्टमॉर्टमला पाठवून पुढील तपास सुरू केला. याबाबत उल्हासनगरचे डीसीपी सुधीर पठारे यांनी सांगितले की, सचिन हा एका मोठ्या कंपनीत नोकरीला होता. त्याची हत्या झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस पथक नेमले आहे. लवकरच सचिन याची हत्या कोणी आणि का केली आहे हे समोर येईल.
(नक्की वाचा - कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत डॉक्टरांकडून हलगर्जीपणा? पत्नीची तब्येत बिघडल्याने पतीची पोलिसांत धाव)
उल्हासनगर क्राईम ब्रँच पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सध्या चौकशी सुरू आहे. मात्र पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन भोसले ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी एका महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. या हत्यामागे हे कारण आहे का? या अँगलने देखील तपास सुरू आहे.