Pune Crime News Today : पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये काळेवाडी परिसरातील एकतानगर भागात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. फक्त अडीच वर्षांच्या चिमुकलीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी 47 वर्षीय नराधमाला काळेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय भोसले असं अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,आरोपीने पीडित मुलीला आंबा खायला देण्याच्या बहाण्याने त्याच्या खोलीत बोलावलें आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मंगळवारी सकाळी चिमुरडीला त्रास होऊ लागल्याने पालकांनी तिला तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
नक्की वाचा >> Kalyan Crime News: 'पहलगाम' हल्ल्याचा धाक दाखवत 82 वर्षीय आजींना 'डिजिटल अरेस्ट'; आयुष्यभराची कमाई लुटली
पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला अन्..
आईने पीडितेला विश्वासात घेऊन विचारले असता, मुलीन तिला याप्रकरणाबाबत सांगितलं. आरोपीने घरात बोलावून अत्याचार केल्याचं तिने सांगितलं. या घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. काळेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत एक पथक रुग्णालयात तर दुसरे पथक आरोपीच्या घरी पाठवून त्याला तातडीने अटक केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या 28 वर्षीय आईने फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.