अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत (Anti-Narcotics Drive) मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. देवी विसर्जन बंदोबस्ताच्या वेळी केलेल्या तपासणीदरम्यान ट्रॉम्बे पोलिसांनी एका संशयास्पद वाहनाची तपासणी करून तब्बल 12 किलो 426 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. या गांजाची अंदाजित किंमत सुमारे 1.60 लाख रुपये इतकी आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांसह एकूण मुद्देमालाची किंमत ₹15.12 लाख इतकी आहे.
पहिल्या कारवाईत, पोलिसांनी संशयास्पद वाहन तपासणी मोहीम राबवत असताना राहुल पिंटू शिंदे (वय 23, राठी, देसाई गाव, शिळफाटा, कल्याण, ठाणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 8 किलो 176 ग्रॅम गांजा (किंमत सुमारे ₹1.60 लाख) हस्तगत करण्यात आला. याचबरोबर त्याची 8 लाखांची व्हॅगनार कार, ₹4,000 किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन आणि ₹3,000 रोख रक्कम असा एकूण ₹9.67 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी अधिनियम 1985 च्या कलम 8(क), 20(ब), 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल लोंढे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू केला असता, त्यांना या प्रकरणातील दुसरा आरोपी राजू अंबादास शिंदे (वय 35, देसाई गाव, पाटील पाडा, पोस्ट पडले, ठाणे) याच्याबद्दल माहिती मिळाली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याचा कल्याणपासून पाठलाग केला आणि अखेरीस त्याला वाशी टोलनाक्याजवळ मुंबईकडे जात असताना अटक केली.
राजू शिंदे याच्याकडून 2 किलो 50 ग्रॅम गांजा (किंमत ₹40,000), ₹5 लाख किमतीची मारुती सुझुकी कार, ओप्पो मोबाईल आणि ₹5,718 रोख रक्कम असा एकूण ₹5.45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीदरम्यान, राजू शिंदे हा मानखुर्द परिसरातील चिता कॅम्प, महाराष्ट्र नगर भागात गांजाची विक्री करण्यासाठी आणत असल्याची माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे, आरोपी राजू शिंदे याच्यावर यापूर्वीही धाराशिव येथे अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत 2 गुन्हे दाखल आहेत.
सपोनि सुशिल लोंढे, पोउनि शरद नाणेकर यांच्यासह पोशि पाटील, पोशि शिवाजी सकट, पोशि गोविंद बाड, मपोशि सुजाता जगदाळे यांचा या यशस्वी कारवाईत सक्रिय सहभाग होता. या पथकाची ही सलग तिसरी अंमली पदार्थ विरोधी कारवाई आहे. यापूर्वी याच पथकाने ट्रॉम्बे हद्दीत ₹40,000 किमतीचा 40 ग्रॅम एमडी (MD) हा अंमली पदार्थही जप्त केला होता. मा. अपर पोलीस आयुक्त महेश पाटील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करांना जरब बसला असून नागरिकांनी पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक केले आहे.