सांगली: महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या एका 22 वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्या दोन वर्गमित्रांनी आणि त्यांच्या एका मित्राने शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी पुणे, सोलापूर आणि सांगली येथील रहिवासी असलेल्या तीन आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासाशी निगडीत एका पोलीस अधिकाऱ्याने याबद्दलची माहिती दिली आहे.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पीडित विद्यार्थिनी मूळची कर्नाटक राज्यातील बेळगावची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 18 मे रोजी घडली. पीडित तरुणी आणि आरोपींनी चित्रपट पाहण्याचं ठरवलं होतं. रात्री 10 च्या सोसाठी जाण्याचं या सगळ्यांनी ठरवलं. मात्र पीडितेला तिच्या मित्रांनी थोडावेळ थांबूया असं सांगत एका फ्लॅटवर नेलं होतं. फ्लॅटवर, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपींनी पीडितेला कोल्ड ड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं. होतं. ते प्यायल्यानंतर पीडितेला चक्कर यायला लागली आणि अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर, 20 ते 22 वयोगटातील आरोपींनी आपल्यावर आळीपाळीने बलात्कार केला असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. याबद्दल वाच्यता केल्यास परिणाम वाईट होती असं म्हणत आरोपींना मला धमकावलं होतं असंही तक्रारीत म्हटलं आहे.
या घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला, ज्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी तीनही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार सामूहिक बलात्कार आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तक्रारदार तरुणीच्या जबाबाचे बारकाईने विश्लेषण करणे सुरू केले असून पुढील तपास सुरू आहे.