शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Melghat News : मेळघाटातील शासकीय आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्याचा संतापजनक प्रकार सातत्याने समोर येत आहे. २५ जुलै रोजी टीटंबा येथील आश्रमशाळेत ७० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
२५ जुलै रोजी टीटंबा येथील ७० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. त्यानंतर बीजुधावडी शासकीय आदिवासी आश्रमशाळेत ३० ते ४० विद्यार्थ्यांना पोट दुखत असल्याने त्यांना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. यानंतर सावलीखेडा आश्रम शाळेतही २० विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांनाही पोटदुखी आणि मळमळीचा त्रास सुरू झाला होता. रात्रीच्या जेवणानंतर २० आदिवासी विद्यार्थ्यांना पोटदुखी, मळमळ, उटल्यांचा त्रास सुरू झाला होता. या दोन्ही आश्रमशाळेतील मुलांनाही अन्नातून विषबाधा झाल्याची चर्चा आहे.
आदिवासी विकासमंत्री दौऱ्यावर असताना धक्कादायक प्रकार...
सेंट्रल किचनमधूनच तब्बल ८ ते ९ आश्रमशाळांना अन्नपुरवठा केला जातो. निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके हे स्वतः आज दुपारपासून मेळघाट दौऱ्यावर असतानाच ही दुसरी घटना घडल्याने संताप व्यक्त होतं आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक जिल्हाधिकारी, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके तातडीने बीजुधावडीकडे रवाना झाली आहेत. कालच्या घटनेनंतरही प्रशासनाने कोणताही धडा घेतला नाही का? असा संतप्त सवाल आता विचारला जात असून संपूर्ण मेळघाटात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
विशेष म्हणजे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके स्वतः धारणी दौऱ्यावर असताना हा प्रकार घडल्याने प्रशासनाचे वाभाडे निघाले आहेत. 'सेंट्रल किचन'च्या निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळेच हे विषबाधेचे सत्र सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. मेळघाटची माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांनी सेंट्रल किचनच्या तंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.