जाहिरात

शिवसेना नेत्याच्या मुलींसाठी उपमुख्यमंत्र्यांचा पुढाकार,मात्र शेख यांचा मृत्यू कसा झाला? अकोल्यात खळबळजनक घटना

मोहसीन शेख यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी ही घटना केवळ रस्ते अपघात नसून नियोजित हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

शिवसेना नेत्याच्या मुलींसाठी उपमुख्यमंत्र्यांचा पुढाकार,मात्र शेख यांचा मृत्यू कसा झाला? अकोल्यात खळबळजनक घटना

योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला

Akola News : अकोला जिल्ह्यातील शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाप्रमुख मोहसीन शेख यांचे अपघातानंतर उपचारादरम्यान शनिवारी नागपूर येथे निधन झाले. 23 जुलै रोजी नेहरू पार्क परिसरात झालेल्या वाहन अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. सुरुवातीला त्यांच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये शोककळा पसरली.

अपघातानंतर कुटुंबीयांचा गंभीर आरोप, निष्पक्ष चौकशीची मागणी

मोहसीन शेख यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी ही घटना केवळ रस्ते अपघात नसून नियोजित हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि निष्पक्ष, सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करत नातेवाईक आणि समर्थकांनी खदान पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच काही शिवसेना पक्षाच्या बड्या नेत्यांवरही कटकारस्थानाचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून शहरात विविध स्तरावर चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, या आरोपांबाबत संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Latest and Breaking News on NDTV

पोलिसांचा तपास वेगात, दोन विशेष पथके तैनात

या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. कुटुंबीयांची बाजू ऐकून घेत आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. अपघाताच्या सर्व पैलूंची आणि उपलब्ध पुराव्यांची तपासणी सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीला लवकरच अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी दिली.

नक्की वाचा - Nagpur News : 'पेपर लिक करणाऱ्यांना फाशी द्या', आकांशाचं कुटुंब अजूनही धक्क्यात; सरकारकडे केली मागणी

शिंदेंकडून कुटुंबाला दिलासा

दरम्यान, या घटनेची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यांनी शिवसेनेचे विशेष जिल्हा प्रभारी ललित वानखडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून मोहसीन शेख यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मोहसीन शेख यांच्या दोन मुलींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिवसेना पक्ष उचलणार असल्याचे आश्वासन दिले. या निर्णयामुळे शोकाकुल कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला असून, पक्षाकडून आर्थिक व सामाजिक आधार देण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com