सुनेच्या अंगात भूत असल्याचं समजून सासरच्यांनी तेल, पाणी आणि साबण अशा वस्तूंचा वापर करून महिलेसोबत धक्कादायक (Crime News) प्रकार केल्याचं समोर आलं आहे. सासरच्यांकडून अंधश्रद्धेपोटी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या धक्कादायक प्रकाराची तक्रार विवाहितेने शुक्रवारी 12 जुलै रोजी मोर्शी पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी विकास अरुणराव आंडे (26, सिंभोरा), नणंद (30, रा. चांदस वाठोडा), मौलाना (रा. पाळा), अंकुश राजगुरे (30) आणि अक्षय राजगुरे (30) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवरून ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही काही ठिकाणी अंधश्रद्धेचे प्रकार सुरुच असल्याचे दिसून येत आहे.
मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 21 वर्षीय विवाहितेचा अंधश्रद्धेच्या नावाखाली सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ केला. विवाहितेच्या अंगात भूत आहे, असे समजून सासरच्यांनी घरी एका बाबांना बोलावून घेतलं. त्यानंतर विवाहितेला पकडून तिच्यावर वात, मोहरीचे तेल, पाणी आणि साबण यासारख्या वस्तुंचा वापर करून मंत्रोच्चार करण्यात आला. हा प्रकार पाहून विवाहित चांगलीच घाबरली. अखेर या त्रासाला कंटाळून विवाहितेने मोर्शी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
नक्की वाचा - पुजाऱ्याच्या रुपात हैवान! मुंबईतील मंदिरात 30 वर्षीय महिलेवर आळीपाळीने अत्याचार, पुढे भयंकर घडलं!
यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बीएनएस कलम 85, 115, (2), 352, 3 (5), सहकलम 3 (1), (2) (3) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. या गुन्ह्यात 7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे तपास सुरू असल्याची माहिती मोर्शी पोलिसांकडून देण्यात आली आहे.