Badlapur News : बदलापूरात राहणाऱ्या एका तरुणीच्या वक्तव्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. बदलापुरात राहणारी तरुणी मृणाल जाधव हिने श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला आहे. तिच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे मृणाल जाधव हिचे आई-बाबा दोघेही भाजपचे सक्रिय नेते आहे. बदलापूर भाजप पूर्व शहर अध्यक्ष प्रतिभा जाधव यांची ती मुलगी आहे.
श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य....
गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या २३ दिवसांपासून मृणाल न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणी तिने कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जाधव हिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे जाधव हिचा मुक्काम आधारवाडी कारागृहात राहणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी जाधव हिने श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर टाकला होता. हा व्हिडिओ पाहताच हिंदुत्ववादी संघटनांनी तिच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेत तिच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी, तिला तातडीने अटक करावी अशी मागणी केली होती.
मृणालचा अर्ज फेटाळला...
बदलापूर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत जाधव हिला अटक केली होती. ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. जाधव हिने प्रथम अंबरनाथ न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तिचा अर्ज अंबरनाथ न्यायालयाने फेटाळून लावला होता. तिने पुन्हा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाकडे अर्ज केला होता. या अर्जावर आज (२३ मार्च २०२६) सुनावणी होती. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष राणी जवळेकर यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीच्या वतीने वकील रेश्मा भोपी यांनी युक्तीवाद केला. जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी हिंदुत्ववादी संघटनाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी न्यायालयात मोठ्या संख्येने उपस्थित होते. वकिल भोपी यांनी युक्तीवाद केला की, आरोपी जाधव हिला जामीन मंजूर केल्यास या प्रकरणातील तपास कामात हस्तक्षेप केला जाऊ शकतो. हा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरीत जाधव हिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी जवळेकर यांनी सांगितले की, २६ मार्च रोजी रामनवमी आहे. श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जाधव हिला न्यायालयाने जामीन नाकारल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.