रिझवान शेख, प्रतिनिधी
Mumbai Crime News: मुंबईतील विक्रोळी परिसरात भावा-भावांच्या वादातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास घरात मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावांमध्ये तुफान हाणामारी झाली. या वादाचे रूपांतर पुढे हिंसक हल्ल्यात झाले असून, दोन भावांनी मिळून तिसरा भाऊ आणि त्याच्या अवघ्या 14 वर्षांच्या मुलावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात बाप-लेख दोघेही गंभीर जखमी झाले असून, परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
विक्रोळीतील राहुल नगरमधील एका इमारतीत विश्वकर्मा कुटुंबातील 4 भाऊ एकत्र राहत होते. 6 ऑगस्टच्या पहाटेच्या सुमारास सुनील विश्वकर्मा यांनी घरात मोठ्या आवाजात गाणी लावली होती. इतक्या पहाटे मोठ्या आवाजात लावलेल्या गाण्यांवर त्यांचे भाऊ सुरेंद्र आणि सूरज विश्वकर्मा यांनी तीव्र आक्षेप घेतला.
सुरुवातीला या विषयावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मात्र, काही मिनिटांतच हा वाद अत्यंत विकोपाला गेला. रागाच्या भरात सुरेंद्र आणि सूरज यांनी सुनील यांना आधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर चाकू काढून सुनील व त्यांचा 14 वर्षांचा मुलगा श्लोक यांच्यावर सपासप वार केले.
(नक्की वाचा : Ramesh Mhatre: मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रे जेलमधून बाहेर येणार, पण... हायकोर्टानं ठेवली मोठी अट )
बाप-लेकाची मृत्यूशी झुंज
या भीषण हल्ल्यात सुनील आणि त्यांचा मुलगा श्लोक दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले असून, त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या दोघेही तिथे मृत्यूशी झुंज देत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ही भांडणे केवळ गाणी लावण्यावरून झाली असली, तरी या भावांमध्ये पूर्वीपासूनच काही जुने वाद असावेत असा संशय पोलिसांना आहे.
( नक्की वाचा : Nashik News: देशासाठी गोल्ड जिंकणारा मराठी खेळाडू राज ठाकरेंच्या दारात 2 तास ताटकळला!नाशिकमधील धक्कादायक घटना )
याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुस्ताक खान आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला आहे. किरकोळ कारणावरून सख्ख्या भावांनीच असा रक्ताचा खेळ खेळल्याने आणि एका बाजूला बाप-लेक रुग्णालयात तर दुसरीकडे दोन्ही भाऊ पोलीस कोठडीत गेल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.