Mumbai News: 17 संशयित आणि DNA रिपोर्ट ; स्वतःच्याच लेकीला गरोदर करणाऱ्या नराधम बापाचा असा काढला पोलिसांनी शोध

Cuffe Parade Rape Case:  मुंबईतील कफ परेड परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे

जाहिरात
Read Time: 3 mins
Mumbai Crime News : पीडित तरुणीने आपल्या आजीकडे पोटातील त्रासाबद्दल तक्रार केली होती.
मुंबई:

Cuffe Parade Rape Case:   मुंबईतील कफ परेड परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 20 वर्षांच्या दिव्यांग तरुणीवर तिच्याच जन्मदात्या बापानं बलात्कार केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. ही तरुणी बोलू आणि ऐकू शकत नाही, याचा फायदा घेत हा क्रूर प्रकार करण्यात आला. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तब्बल 17 संशयितांच्या डीएनए चाचण्या केल्या होत्या, ज्यामध्ये अखेर पीडित तरुणीच्या वडिलांचा डीएनए गर्भाशी जुळला आहे.

काय आहे प्रकरण?

या घटनेची सुरुवात सप्टेंबर 2025 मध्ये झाली. त्यावेळी पीडित तरुणीने आपल्या आजीकडे पोटातील त्रासाबद्दल तक्रार केली होती. हाताच्या खुणांनी संवाद साधताना तिने आपल्या पोटात काहीतरी वळवळत असल्याचं सांगितलं होतं. यानंतर तिला तातडीने कामा अँड अल्ब्लेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

डॉक्टरांनी जेव्हा तिची वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. ती तरुणी 5 महिन्यांची गरोदर असल्याचं समोर आलं. या गंभीर घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तातडीने पोलिसांना पाचारण केलं.

(नक्की वाचा : Pune News: पुण्यात मध्यरात्री काय घडलं? प्रियकराचा काटा काढण्यासाठी आईने पोटच्या गोळ्यालाच दिली 'सुपारी' )

पोलिस तपासातील सुरुवातीचे अडथळे

कफ परेड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा त्यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे पीडित तरुणीशी संवाद साधणं. ती तरुणी दिव्यांग असल्याने आणि सुरुवातीला जबाब देण्यास तयार नसल्याने पोलिसांना अडचणी येत होत्या. 

Advertisement

पोलिसांनी सुरुवातीला तिच्या वडिलांकडे चौकशी केली, मात्र त्यांनी लैंगिक शोषणाचे सर्व आरोप फेटाळून लावले. आपली मुलगी गरोदर कशी राहिली, याबाबत त्यांनी कोणताही खुलासा केला नाही आणि तक्रार दाखल करण्यासही नकार दिला.

कौन्सिलिंगनंतर समोर आलं सत्य

पोलिसांनी हार न मानता तरुणीचं कौन्सिलिंग केलं, त्यानंतर ती तक्रार देण्यासाठी तयार झाली. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला एका व्यक्तीला अटक केली आणि एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं. 

Advertisement

मात्र, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी शास्त्रीय पुराव्यांचा आधार घेण्याचं ठरवलं. पोलिसांनी वडिलांसह एकूण 17 संशयितांचे डीएनए आणि रक्ताचे नमुने गोळा केले. या सर्व नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात आली.

( नक्की वाचा : 'एक हसीना थी, एक दीवाना था'..हनिमूनहून परतताच पत्नीचा खळबळजनक कारनामा; चित्रपटालाही मागे टाकेल असा शेवट! )

डीएनए रिपोर्टने उघड केला बापाचा खरा चेहरा

बलात्कार नेमका कोणी केला हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी गर्भातील भ्रूणाचे जेनेटिक डेटा आणि संशयितांचे डीएनए नमुने जुळवून पाहिले. 27 जानेवारी रोजी या चाचणीचा अहवाल प्राप्त झाला आणि त्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आलं. 

Advertisement

17 संशयितांपैकी केवळ एकाच व्यक्तीचा डीएनए पॉझिटिव्ह आला आणि ती व्यक्ती म्हणजे पीडित तरुणीचे स्वतःचे वडील होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2025 ते 21 सप्टेंबर 2025 या कालावधीत हा अत्याचार झाला होता. याप्रकरणी 22 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून आता नराधम बापाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Topics mentioned in this article