Honeymoon Murder: एक हसीना थी, एक दीवाना था! साध्या शब्दांत सांगायचं तर एक काळजाला भिडणारी प्रेमकथा, पण या कथेचा शेवट एखाद्या थरारक चित्रपटासारखा होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. ऋषी कपूर यांच्या कर्ज चित्रपटाची कथा तुम्हाला आठवतेय? जिथे संपत्तीसाठी पत्नी आपल्या पतीचा काटा काढते. राजस्थानमध्ये अगदी तसाच प्रकार घडला आहे.
नुकतंच लग्न झालं होतं, हातावरची मेहंदीही नीट सुकली नव्हती आणि हनिमूनहून परतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांच्या संसाराचा भयानक अंत झाला. सुरुवातीला हा निव्वळ अपघाताचा गुन्हा वाटत होता, पण जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा समोर आलेलं सत्य ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.

हनिमून मर्डर 2.0: घातपाताचा असा रचला कट
घटनेची सुरुवात झाली 30 जानेवारीच्या संध्याकाळी. राजस्थानमधील श्रीगंगानगर भागात एक नवविवाहित जोडपं रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलं होतं. आशिष आणि अंजू आपल्या भविष्यातील स्वप्नांबद्दल बोलत चालले असावेत असं वाटत असतानाच, अंधारातून एक काळ आला.
एका भरधाव वाहनानं आशिषला जोरदार धडक दिली. आशिष रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अंजू देखील रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा अंजूनं सांगितलं की, एका अज्ञात वाहनानं त्यांना धडक दिली आणि तिचे सोन्याचे दागिनेही लुटून नेले.
( नक्की वाचा : Dombivli News लेकीच्या रक्षणासाठी बाबा धावला, पण मद्यधुंद तरुणांनी अख्खं कुटुंबच फोडून काढलं; डोंबिवली हादरली )
पोलिसांचा संशय आणि तपासाची दिशा
श्रीगंगानगरच्या पोलीस अधीक्षक अमृता दुहान यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सुरुवातीला हा हिट अँड रनचा आणि चोरीचा प्रकार वाटत होता. मात्र, फॉरेन्सिक टीमनं जेव्हा तांत्रिक तपास केला, तेव्हा काही गोष्टी खटकू लागल्या.
आशिषच्या शरीरावर केवळ अपघाताच्याच खुणा नव्हत्या, तर त्याच्या गळ्यावर फास दिल्याचे निशाणही दिसत होते. दुसरीकडे, अंजूच्या अंगावर साधी ओरखडाही नव्हती, जी अशा भीषण अपघातात शक्य नव्हती. अंजू वारंवार आपले जबाब बदलत होती, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

प्रियकरासोबत मिळून रचला मृत्यूचा सापळा
अंजूच्या फोन रेकॉर्डची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. तिचं लग्नानंतरही संजू नावाच्या तिच्या जुन्या प्रियकराशी बोलणं सुरू होतं. अंजूचं लग्न 3 महिन्यांपूर्वी आशिषशी झालं होतं, पण ती या लग्नामुळे खुश नव्हती. लग्नानंतर ती काही दिवस माहेरी गेली होती आणि तिथेच तिनं संजूला भेटून आशिषला संपवण्याचा कट रचला.
30 जानेवारीच्या रात्री अंजू मुद्दाम आशिषला एका निर्जन रस्त्यावर घेऊन गेली. तिथे संजू आणि त्याचे दोन साथीदार रॉकी आणि बादल आधीच झाडाझुडपात लपून बसले होते.

अपघाताचा बनाव असा उघड झाला
नियोजन केल्याप्रमाणे, त्या तिघांनी आशिषवर निर्घृण हल्ला केला आणि त्याचा गळा दाबून खून केला. हा प्रकार अपघाती वाटावा म्हणून त्यांनी आशिषला वाहनानं धडक दिल्याचं भासवले. या कटाचा भाग म्हणून अंजूनं स्वतःचे दागिने आणि फोन त्या आरोपींकडे दिले, जेणेकरून पोलिसांना वाटेल की ही लूटमारीची घटना आहे.
हल्ला झाल्यानंतर अंजू तिथेच बेशुद्ध पडल्याचं नाटक करत राहिली. मात्र, आशिषच्या शरीरावरील जखमांनी अंजूचा हा सर्व बनाव उघडा पाडला. पोलिसांनी आता अंजू, तिचा प्रियकर संजू आणि इतर दोन साथीदारांना अटक केली आहे.
( नक्की वाचा : Dombivli: डोंबिवलीत राजकीय संघर्षाला धार; भाजपा कार्यकर्त्यावरील हल्लाप्रकरणी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना अटक )
मेघालयातील हनिमून मर्डरची आठवण
ही घटना पाहून पोलिसांना मेघालयातील त्या गाजलेल्या हनिमून मर्डरची आठवण झाली. तिथेही सोनम रघुवंशी नावाच्या महिलेनं आपल्या पतीला, राजा रघुवंशीला हनिमून दरम्यान प्रियकराच्या मदतीनं मारलं होतं. राजस्थानमधील ही घटना देखील हुबेहूब तशीच असल्यानं याला हनिमून मर्डर 2.0 म्हटलं जात आहे. एका जुन्या प्रियकरासाठी पत्नीनं आपल्या पतीचा विश्वासघात करून त्याचा जीव घेतल्यानं संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world