जाहिरात

Crime News : 100 तोळे सोने देऊनही सासरच्यांची भूक मिटेना; मुंबईच्य उच्चभ्रू कुटुंबातील छळाची धक्कादायक कहाणी

Mumbai Dowry Harassment Case :  मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या आणि उच्चशिक्षित कुटुंबातील एक भयंकर वास्तव समोर आले आहे.

Crime News :  100 तोळे सोने देऊनही सासरच्यांची भूक मिटेना; मुंबईच्य उच्चभ्रू कुटुंबातील छळाची धक्कादायक कहाणी
Mumbai Dowry Harassment Case : सासरच्या मंडळींनी एका 4 BHK फ्लॅटची मागणी लावून धरली होती. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Mumbai Dowry Harassment Case :  मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या आणि उच्चशिक्षित कुटुंबातील एक भयंकर वास्तव समोर आले आहे. ज्या सासरच्या घरी मुलीला सुखात ठेवण्याचे वचन दिले जाते, तिथेच पैशांच्या हव्यासापोटी तिचा नरक यातनांसारखा छळ सुरू होता. लग्नात 100 तोळे सोने आणि कोट्यवधी रुपये देऊनही सासरच्यांची भूक भागली नाही. अखेर या छळाला कंटाळून एका 39 वर्षीय विवाहितेने न्यायासाठी पोलिसांचे दरवाजे ठोठावले आहेत.

काय आहे प्रकरण?

मुंबईच्या परेल परिसरात राहणाऱ्या या पीडित महिलेचा विवाह 2017 मध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला होता. मुलीच्या वडिलांनी आपल्या लेकीच्या सुखासाठी लग्नात कोणतीही कसर सोडली नव्हती. 100 तोळे सोने, पतीसाठी महागडे दागिने आणि लग्नाचा इतर 40 लाख रुपयांचा खर्च असे सगळे करूनही सासरच्या मंडळींचे समाधान झाले नाही.

लग्नानंतर काही दिवसातच पती आणि त्याच्या नातेवाईकांनी तिला लग्नात कमी सोने दिल्याचा टोमणा मारत माहेरून अधिक पैसे आणण्यासाठी भाग पाडण्यास सुरुवात केली.

(नक्की वाचा : Pune News : 'तिला' भेटायला गेला अन् सर्वस्व गमावून बसला! पुण्यात Dating App च्या नावाखाली भयंकर प्रकार )

संसार टिकवण्यासाठी वडिलांकडून महिन्याला लाखो रुपयांची मदत

सासरच्यांची पैशांची मागणी इतकी टोकाला गेली होती की, पीडितेच्या वडिलांना दरमहा 1.50 लाख रुपये द्यावे लागत होते. हे पैसे दिले तरच तिचा संसार सुरळीत चालत असे. 

इतकेच नव्हे तर परदेशात फिरायला जाण्यासाठी किंवा इतर चैनीसाठीही माहेरूनच आर्थिक रसद पुरवली जात होती. एका सुशिक्षित घरात अशा प्रकारे पैशांसाठी एका महिलेचा मानसिक छळ केला जात असल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

फ्लॅटसाठी छळ आणि कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी

हव्यास तिथेच थांबला नाही, तर आता सासरच्या मंडळींनी एका 4 BHK फ्लॅटची मागणी लावून धरली होती. मुलाचे वय वाढत असल्याचे कारण देत हा आलिशान फ्लॅट वडिलांकडूनच घेऊन देण्याचा दबाव पीडितेवर टाकला जात होता. 

ही मागणी पूर्ण होत नसल्याने तिला मारहाण आणि शिवीगाळ केली जात असे. तक्रारीनुसार, मुलीचा संसार टिकावा म्हणून वडिलांनी आतापर्यंत चेकद्वारे 39 लाख रुपये आणि कोट्यवधी रुपये रोख स्वरूपात सासरच्यांच्या पदरात टाकले आहेत.

वारंवार होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास सहन न झाल्याने पीडित महिलेने अखेर काळाचौकी पोलीस ठाणे गाठले. तिने दिलेल्या सविस्तर तक्रारीनंतर पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हुंड्यासारख्या प्रथेने एका सुशिक्षित महिलेचे आयुष्य कसे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com