Pune Crime: पुणे शहरातील कोंढवा परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी पाच जणांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले साहित्यही हस्तगत केले आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणातील आरोपींनी डिजिटल युगातील डेटिंग अॅपचा वापर गुन्हेगारीसाठी केल्याचे समोर आले आहे. ही टोळी डेटिंग अॅपवर बनावट किंवा आकर्षक प्रोफाईलच्या मदतीने तरुणांशी ओळख वाढवत असे. एकदा का तरुण त्यांच्या संपर्कात आला की, त्याला विश्वासात घेऊन एकांत स्थळी भेटण्यासाठी बोलावले जात असे. 11 जानेवारी रोजी अशाच एका तरुणाला या टोळीने रात्रीच्या वेळी भेटण्यासाठी बोलावले आणि तिथेच या लुटीचा थरार सुरू झाला.
कोयत्याचा धाक दाखवला आणि...
पीडित तरुण ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर या टोळीने त्याला घेरले. आरोपींनी त्या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील महागडा मोबाईल आणि दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले.
एवढ्यावरच न थांबता या टोळीने तरुणाला धमकावून जवळच्या एटीएम केंद्रावर नेले आणि तिथून जबरदस्तीने रोख रक्कम काढायला लावली. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणाने पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.
( नक्की वाचा : Badlapur News: बदलापूर हादरले! त्या दिवशी स्कूल व्हॅनमध्ये नक्की काय घडले? RTO कारवाईनंतर अनेक प्रश्न उपस्थित )
कसे सापडले आरोपी?
या घटनेचे गांभीर्य ओळखून कोंढवा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांच्या खबऱ्यांकडून मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारे पोलिसांनी कोंढवा परिसरात सापळा रचून पाच संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रोहिल अकील शेख (वय 19, रा. कोंढवा), नुहान नईम शेख (वय 18, रा. कोंढवा), शाहिद शाहनूर मोमीन (वय 25, रा. संतोषनगर, कात्रज), इशान निसार शेख (वय 25, रा. अंजलीनगर, कात्रज) आणि वाहिद दस्तगीर शेख (वय 18, रा. कोंढवा) यांचा समावेश आहे.
आणखी दोन गुन्ह्यांचा खुलासा
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या टोळीने केवळ एकाच तरुणाला लुटले नसून, अशाच प्रकारचे आणखी दोन गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. या टोळीकडून पोलिसांनी 3 मोबाईल, एक कोयता आणि गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी जप्त केल्या आहेत. या टोळीने इतर कोणाकोणाला अशा प्रकारे लुटले आहे का, याचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत.
( नक्की वाचा : Nashik News: सून किंचाळत होती अन् सासरा काठीने मारत होता; पोटच्या मुलाने शूट केला सर्व प्रकार, पाहा VIDEO )
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
सोशल मीडिया आणि डेटिंग अॅप्सचा वापर करताना तरुणांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अज्ञात व्यक्तीशी संवाद साधताना किंवा अनोळखी ठिकाणी भेटायला जाताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा. जर कोणासोबत अशा प्रकारचा फसवणुकीचा किंवा लुटीचा प्रकार घडला असेल, तर त्यांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन कोंढवा पोलिसांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world