मुंबई: मुंबईमधून तिहेरी हत्याकांडाची भयंकर घटना समोर आली आहे. मुंबईच्या दहिसर पश्चिम भागातील एचएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन कुटुंबामध्ये जुन्या वादातून तुफान हाणामारी झाली. कोयता, चाकू घेऊन सुरु झालेल्या या हल्ल्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झालेत. या भयंकर घटनेने मुंबई शहर हादरुन गेले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईतील एमएचबी पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास नवल गुप्ता आणि हमीद शेख यांच्यात जुन्या वैमनस्यातून हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झालेत. एमएचबी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गणपत पाटील नगर येथील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या शेख आणि गुप्ता कुटुंबांमध्ये 2022 पासून वाद वाढले होते. हा वाद पोलीस स्टेशन पर्यंतही गेला होता. पोलिसात दोन्ही कुटुंबांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रविवारी (ता. 18मे) संध्याकाळी 4.30 च्या सुमारास हमीद शेख दारूच्या नशेत राम नवल गुप्ता यांच्या नारळाच्या दुकानात आला आणि त्यांना शिवीगाळ करू लागला, ज्यामुळे दोघांमध्ये वाद झाला, दोघांनीही आपल्या मुलांना बोलावले. राम नवल गुप्ता यांनी त्यांच्या अमर गुप्ता, अमित गुप्ता आणि अरविंद गुप्ता या तिन्ही मुलांना बोलावले. तर हमीद नसीरुद्दीन शेख यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना अरमान हमीद शेख आणि हसन हमीद शेख यांना बोलावले.
Beed News: मारहाण प्रकरणाने नागरिकांचा संताप! परळीसह विविध ठिकाणी बंदची हाक; 4 मोठ्या मागण्या केल्या
त्यानंतर दोघांमध्ये धारदार शस्त्रांनी हाणामारी झाली. या झटापटीत राम नवल गुप्ता आणि अरविंद गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला तर अमर गुप्ता आणि अमित गुप्ता जखमी झाले. मारहाणीत हमीद शेख यांचाही जागीच मृत्यू झाला आणि त्यांचे मुलगे अरमान शेख आणि हसन शेख हेही जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.