Dr Stuti Sonawane Suicide Mumbai : एका डॉक्टर तरुणीचं स्वप्नवत वाटणारं प्रेमप्रकरण अखेर मृत्यूच्या दारात कसं जाऊन ठेपलं, याची धक्कादायक कहाणी आता समोर आली आहे. मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात राहणाऱ्या स्तुती सोनवणे या डॉक्टर तरुणीने 8 मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं. सुरुवातीला ही केवळ एक आत्महत्येची घटना वाटत असली तरी, स्तुतीने मागे सोडलेल्या 6 पानांच्या सुसाईड नोटने या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं आहे. या चिठ्ठीत तिने आपला प्रियकर फौझील खानसोबतच्या नात्याचा प्रवास आणि त्यातून मिळालेल्या वेदनांचा पाढाच वाचला आहे.
मैत्रीपासून प्रेमापर्यंतचा प्रवास
स्तुती आणि फौझील यांची पहिली भेट मुंबईतील दादर भागात झाली होती. पहिल्या भेटीत दोघांनी बराच वेळ चालत गप्पा मारल्या आणि पिझ्झा खाल्ला. तिथूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली.
फौझीलनं स्तुतीचा वाढदिवस मुंबईतील प्रतिष्ठित ताज हॉटेलमध्ये साजरा केला होता. त्याने स्वतः ती खोली सजवून स्तुतीला विशेष वाटेल असं वातावरण निर्माण केलं होतं. कुणीतरी आपल्याला इतकं खास वागवू शकतं, यावर स्तुतीचा विश्वासच बसत नव्हता आणि याच कारणाने ती फौझीलच्या प्रेमात पूर्णपणे बुडाली होती.
( नक्की वाचा : Kalyan News: "बायकोची हत्या करून आलोय", पोलीस ठाण्यात शिरला अन् थेट कबुली दिली; कल्याणमधील धक्कादायक घटना )
अलिबाग ट्रीप आणि आनंदाचे क्षण
त्यांच्या प्रेमाच्या सुरुवातीच्या काळात अनेक आनंदाचे क्षण होते, ज्याचा उल्लेख स्तुतीने आपल्या चिठ्ठीत केला आहे. अलिबागला गेलेली ट्रीप, बाईकवरून केलेली भटकंती, दर रविवारी होणाऱ्या भेटी आणि एकत्र बॅडमिंटन खेळताना घालवलेला वेळ या आठवणी तिने लिहून ठेवल्या आहेत. इतकंच नाही तर दोघांनी एकत्र डान्स करतानाचे अनेक रिल्स बनवले होते. हे सगळं वरवर पाहता एखाद्या चित्रपटासारखं वाटत होतं, मात्र या सुखाच्या पडद्यामागे एक भयानक वास्तव दडलं होतं.
नात्यातील कडवटपणा आणि टॉक्सिक रिलेशनशिप
स्तुतीने लिहिलेली ही सुसाईड नोट जसजशी पुढे जाते, तसतसा फौझीलचा खरा चेहरा समोर येतो. तिने फौझीलवर पुरुषी अहंकार, सतत होणारा अपमान आणि मारहाणीची भीती असे गंभीर आरोप केले आहेत. नात्यात असतानाही फैजुलच्या मोबाईलमध्ये डेटिंग ॲप्स होते आणि त्याला दारू तसेच सिगरेटचे व्यसन होते, असेही तिने स्पष्ट केले आहे. तो अत्यंत रागीट स्वभावाचा होता. स्तुतीच्या सांगण्यानुसार, जर ती त्याच्या समोर असती तर त्याने तिला नक्कीच मारलं असतं, इतकी भीती तिला वाटत होती.
( नक्की वाचा : Iran US War: इराणमध्ये नवा 'बॉस'! मोजताबा खामेनींच्या पहिल्याच भाषणाने जगात खळबळ; अमेरिकेला दिली मोठी धमकी )
मित्रांनी दिलेला तो धक्कादायक इशारा
या सगळ्यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे स्तुतीच्या मित्र-मैत्रिणींनी तिला दिलेला इशारा. फौझीलचा राग पाहून तिचे मित्र थट्टेने म्हणायचे की, आम्हाला तुझं शरीर फ्रीझमध्ये पाहायला आवडणार नाही. त्यावेळी स्तुतीला हे बोलणं चुकीचं वाटायचं, पण मृत्यूच्या दारात उभी असताना तिला आपल्या मित्रांचे ते शब्द खरे वाटू लागले होते. अखेर मानसिक छळ आणि नात्यातील गुंतागुंत असह्य झाल्याने या डॉक्टर तरुणीने स्वतःला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world