जाहिरात

Doctor Suicide: मैत्री, प्रेम आणि नंतर छळ...फौझीलनं स्तुतीला टोकाचं पाऊल उचलण्यास कसं भाग पाडलं? मोठा खुलासा

 Mumbai Doctor Suicide Case: स्तुती सोनावणे या उमद्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने संपूर्ण मुंबई हादरली असून या प्रकरणाच्या तपासात आता अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी माहिती समोर येत आहे.

Doctor Suicide: मैत्री, प्रेम आणि नंतर छळ...फौझीलनं स्तुतीला टोकाचं पाऊल उचलण्यास कसं भाग पाडलं?  मोठा खुलासा
Mumbai Doctor Suicide Case:  या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
मुंबई:

पारस लांबा, प्रतिनिधी

Mumbai Doctor Suicide Case:  स्तुती सोनावणे या उमद्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने संपूर्ण मुंबई हादरली असून या प्रकरणाच्या तपासात आता अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी माहिती समोर येत आहे. "एक दिवस तू आम्हाला फ्रिजमध्ये सापडशील", असं तिचे मित्रमैत्रिणी तिला मस्करीत म्हणायचे आणि याच वाक्याचा उल्लेख तिने या 6 पानांच्या सुसाईड नोटमध्ये केला आहे. 

नवी मुंबईतील डेंटल कॉलेजमध्ये एमडीएसचे शिक्षण घेणारी 24 वर्षांची स्तुती आपल्या कुटुंबासह एंटोप हिल परिसरात राहत होती. मात्र, प्रियकराकडून मिळणारी वागणूक आणि मानसिक छळामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद फौझील याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

सोशल मीडियावरून मैत्री आणि लग्नाचा प्रस्ताव

मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आणि आरोपी यांची ओळख 2024 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. सुरुवातीला मैत्री असलेल्या या नात्याचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. हे नाते लग्नापर्यंत पोहोचले होते आणि ऑगस्ट 2025 मध्ये आरोपीने आपल्या घरी लग्नाबद्दल चर्चाही केली होती.

मात्र, आरोपीचे वय 31 वर्ष आणि पीडितेचे वय 24 वर्ष असल्याने वयातील अंतरामुळे त्याच्या कुटुंबाने या लग्नाला स्पष्ट नकार दिला. विशेष म्हणजे, मुलाच्या घरून होकार मिळाला असता तरच मुलीच्या घरी सांगण्याचे ठरले होते, त्यामुळे पीडितेच्या कुटुंबाला या सर्व घडामोडींची पुसटशी कल्पनाही नव्हती.

( नक्की वाचा : Doctor Suicide :''तू फ्रिजमध्ये सापडशील"; MDS च्या विद्यार्थिनीच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख, प्रकरण काय? )

उच्चशिक्षित प्रियकराचा संशयी स्वभाव

आरोपी मोहम्मद फौझील हा उच्चशिक्षित असून त्याने एलएलबीचे शिक्षण घेतले आहे आणि तो सध्या इन्व्हेस्टमेंट ब्रोकर म्हणून काम करतो. त्याचे कुटुंब प्रगत विचारांचे असल्याचे सांगितले जात असले तरी, लग्नाची बोलणी फिसकटल्यानंतर दोघांमध्ये प्रचंड वादावादी सुरू झाली होती. 

2025 च्या अखेरीस त्यांच्यातील दुरावा वाढला होता. सुसाईड नोटनुसार, फौझील तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता आणि तिच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ आरोप करत असे. या सततच्या मानसिक छळामुळे ती पूर्णपणे खचली होती.

( नक्की वाचा : Pune News : धक्कादायक! दहावीचा गणिताचा पेपर फुटल्याने खळबळ; विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षेची टांगती तलवार? )

श्रद्धा वालकर हत्याकांडाचा खळबळजनक संदर्भ

या सुसाईड नोटमधील सर्वात अंगावर काटा आणणारा भाग म्हणजे श्रद्धा वालकर हत्याकांडाचा संदर्भ. स्तुतीचे मित्र तिला चेष्टेने फ्रिजमध्ये सापडण्याबाबत बोलायचे, पण तिला आपल्या सुरक्षिततेबद्दल खरोखरच भीती वाटू लागली होती. स्वतःच्या जवळच्या व्यक्तींकडून मिळणाऱ्या अशा प्रतिक्रियांमुळे तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. 

दरम्यान, या प्रकरणात सध्या तरी कोणताही लव्ह जिहादचा अँगल समोर आलेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com