Mumbai Kidnapping Case: मुंबईतील पवई परिसरात एका ऑडिशनसाठी आलेल्या 17 लहान मुलांना वेठीस (बंधक) धरणाऱ्या रोहित आर्याचा थरार अखेर संपुष्टात आला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या आरोपी रोहित आर्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हाय-व्होल्टेज नाट्यमय घटनेने संपूर्ण मुंबई हादरली.रोहित आर्याने इतक्या लहान मुलांना ओलीस का ठेवलं? त्याची नेमकी नाराजी काय होती? या प्रश्नांचे उत्तर आता त्याच्याच एका जुन्या व्हिडिओ आणि पूर्वेतिहासातून समोर आले आहे.
सरकारी थकबाकी आणि उपोषणाचा इतिहास
रोहित आर्याने गेल्या वर्षी पुण्यात तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात 12 दिवस उपोषण केले होते. 'माझी शाळा, सुंदर शाळा' या राज्यव्यापी अभियानातील 'स्वच्छता मॉनिटर' संकल्पनेचे डिझाईन रोहित आर्याने केल्याचा त्याचा दावा आहे.
सरकारी यंत्रणेने त्याचे डिझाईन वापरले, परंतु त्यापोटी येणे असलेले सुमारे 2 कोटी रुपये त्याला दिले नाहीत, असा गंभीर आरोप त्याने केला होता. रोहितला या उपोषणादरम्यान फीट येण्याचा प्रकार घडला होता. त्याने त्यावेळी आत्महत्येची धमकी दिली होती आणि यासाठी केसरकर तसेच त्यांचे सचिव मंगेश शिंदे, आयुक्त मांढरे, समीर सावंत आणि तुषार महाजन यांना जबाबदार धरण्यास सांगितले होते.
( नक्की वाचा : Mumbai Children Kidnap : मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गोळ्या घातल्या )
रोहित आर्याची नाराजी का?
पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवण्यापूर्वी रोहित आर्यानं एक व्हिडिओ बनवला होता, ज्यात त्याने आपली संपूर्ण भूमिका आणि नाराजी स्पष्ट केली होती. तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे त्याने मदत करण्याची मागणी केली होती.
रोहितने 2022 मध्ये त्याने 'स्वखर्चाने' एक प्रकल्प राबवला होता. यानुसार, विद्यार्थ्यांनी 'असमाजिक कृत्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर प्रतिक्रिया द्यायची' होती. म्हणजेच, कोणी कचरा टाकल्यास किंवा थुंकल्यास, त्यांना जागीच थांबवून त्यांची सवय मोडून काढायची होती.
हे अभियान प्रभावी ठरले. त्यानंतर 2023 मध्ये जुलै ते ऑक्टोबर या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते आणि तो टप्पाही यशस्वी झाला होता. त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये झालेल्या 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानात मुख्यमंत्र्यांनी 'स्वच्छता मॉनिटर' संकल्पनेचा समावेश केला. यासाठी सर्वाधिक 10 गुणांचे महत्त्व दिले आणि चांगले बजेटही निश्चित केले, असं रोहितने या व्हिडिओत सांगितले.
हे बजेट अधिकाऱ्यांनी मला दिले नाही,' असा आर्याचा व्हिडिओमध्ये दावा होता. 'त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे स्वच्छता अभियान राबवले, ज्यामुळे चुकीच्या शाळा विजेत्या झाल्या आणि ज्यांनी चांगले काम केले त्या जिंकल्या नाहीत, असं रोहितने सांगितले. त्यावर आक्षेप घेतल्यानंतर 2024 मध्ये बजेट मिळेल आणि त्यावेळी प्रकल्प राबवावा, असे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचं रोहितनं सांगितलं.
( नक्की वाचा : Mumbai Children Kidnap: : 'चुकीचं घडलं तर मुलांना आग लावेल', 19 जणांना ओलीस ठेवणाऱ्यानं काय दिली धमकी? Video )
नाराजीचे कारण काय?
रोहितने व्हिडिओमध्ये सांगितले होते की, किमान 20 ते 25 वेळा मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना फोन करून सूचना दिल्या, पण दरवेळी 'आज होईल, उद्या होईल' असे सांगितले गेले. अखेरीस थकल्यामुळे उपोषण सुरू केले.
व्हिडिओमध्ये त्याने 'माझी शाळा, सुंदर शाळा' चा जीआर पुन्हा निघाला असून त्यात 'स्वच्छता मॉनिटर'चा समावेश आहे, पण आपल्याला कोणतीही कल्पना नाही. हा जीआर फक्त निवडणूककेंद्रीत आहे, योजनेशी त्यांना काहीही देणंघेणं नाही, अशी खंत व्यक्त केली होती.