Mumbai Children Kidnap: Accused Rohit Arya Killed in Police Encounter : मुंबईतील पवई परिसरात ऑडिशनसाठी आलेल्या 17 लहान मुलांना वेठीस (बंधक) धरणारा आरोपी रोहित आर्या पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे. गुरुवारी (30 ऑक्टोबर) दुपारी सुरु झालेला हा थरार संध्याकाळी संपला. पोलिसांनी उत्तर देताना केलेल्या कारवाईत रोहित गंभीर जखमी झाला होता आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
काय आहे नेमकी घटना?
मुंबईतील पवई येथील एका स्टुडिओमध्ये गुरुवारी मोठा गोंधळ उडाला. ऑडिशनसाठी आलेल्या सुमारे 100 मुलांपैकी 17 मुलांना माथेफिरु रोहित आर्याने वेठीस धरले. यामुळे परिसरात मोठी खळबळ माजली आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. तत्काळ पोलिसांचे पथक आणि कमांडो युनिट घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला.
पोलिसांची यशस्वी मोहीम
पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने ऑपरेशन सुरू केले. सुरुवातीला आरोपी रोहित आर्यासोबत बोलून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रोहितने पोलिसांवर गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी कोणतीही हानी होऊ नये यासाठी तात्काळ फोर्स एंट्री करत मुलांना सुरक्षित बाहेर काढले.
( नक्की वाचा : Mumbai Children Kidnap: : 'चुकीचं घडलं तर मुलांना आग लावेल', 19 जणांना ओलीस ठेवणाऱ्यानं काय दिली धमकी? Video )
रोहितने केलेल्या गोळीबारानंतर पोलिसांनीही त्याला प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला. या कारवाईत रोहित आर्या गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची संपूर्ण माहिती अद्याप दिलेली नाही, पण सर्व 17 मुले सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.
रोहित आर्याची मागणी काय होती?
मुलांना बंधक बनवल्यानंतर आरोपी रोहित आर्याने आपण आत्महत्या करण्याऐवजी हा दुसरा मार्ग निवडल्याचे सांगितले. त्याने कोणत्याही पैशाची मागणी केली नव्हती किंवा आपण दहशतवादी नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याला काही प्रश्नांची उत्तरे हवी होती आणि तो काही प्रश्न विचारू इच्छित होता, असे त्याने सांगितले होते. अखेर पोलिसांच्या धाडसी कामगिरीमुळे ही गंभीर घटना यशस्वीरित्या हाताळली गेली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world