जाहिरात

Mumbai Local: दगड लागला अन् डब्यात एकच किंकाळी! दादर स्टेशनवर बदलापूर लोकलमध्ये नेमकं काय घडलं?

Mumbai Local Stone Pelting: मुंबई लोकलमध्ये पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

Mumbai Local: दगड लागला अन् डब्यात एकच किंकाळी! दादर स्टेशनवर बदलापूर लोकलमध्ये नेमकं काय घडलं?
Mumbai Local : दादर स्टेशनवर घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Mumbai Local Stone Pelting: मुंबई लोकलमध्ये पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनवर दगडफेक झाल्याची खळबळजनक घटना दादर रेल्वे स्थानकात घडली. या दगडफेकीत बदलापूरला जाणाऱ्या एका लोकलच्या महिला डब्यातील महिला प्रवासी गंभीर जखमी झाली आहे. भरगच्च गर्दीच्या वेळी आणि मुख्य स्थानकातच अशा प्रकारे हल्ला झाल्याने महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकी घटना काय?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडून बदलापूरच्या दिशेने जाणारी 7.14 ची लोकल दादर स्थानकात येत असताना हा प्रकार घडला. रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करत असतानाच एका अज्ञाताने महिला डब्याच्या दिशेने जोरात दगड भिरकावला. हा दगड डब्यात उभ्या असलेल्या एका महिला प्रवाशाला जाऊन लागला. हा हल्ला इतका अनपेक्षित होता की, डब्यातील इतर महिलांना काही समजण्याच्या आतच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेमुळे डब्यात एकच गोंधळ उडाला.

( नक्की वाचा : Ashok Kharat : 'कुणावरही जबरदस्ती केली नाही, जे केलं ते...'; भोंदू खरातने पोलिसांना काय सांगितलं? वाचा सविस्तर )

महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर इजा

या दगडफेकीत जखमी झालेली महिला डब्यातील दरवाजाच्या जवळ उभी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अज्ञाताने फेकलेला दगड थेट महिलेच्या उजव्या डोळ्याच्या खालच्या बाजूला लागला. यामुळे महिलेच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून डब्यातील इतर प्रवाशांनी तातडीने आरडाओरडा केला आणि लोकल दादर स्टेशनमध्ये थांबताच रेल्वे पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमी महिलेला डब्यातून खाली उतरवून दादर रेल्वे स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर महिलेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.या घटनेमुळे काही काळ रेल्वे स्थानकावर तणावाचे वातावरण होते.

( नक्की वाचा : New COVID: कोरोनाचं रूप बदललं! BA.3.2 चा जगभर धुमाकूळ; ताप, खोकला की आणखी काही? नवी लक्षणं आली समोर )

रेल्वे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

गर्दीच्या वेळी दादरसारख्या गजबजलेल्या स्थानकात दगडफेक करण्याची हिम्मत कोणी केली, याचा तपास आता रेल्वे पोलीस करत आहेत. रेल्वे स्थानकातील आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, संशयित व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. वारंवार लोकलवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांमुळे रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, प्रवाशांनी अशा नराधमांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com