Ashok Kharat Case: नाशिकमध्ये स्वतःला बाबा म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातचा खरा चेहरा आता समोर आला असून, त्याने पोलीस चौकशीत केलेला दावा ऐकून तपासी अधिकारीही चक्रावून गेले आहेत. बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटकेत असलेल्या या भोंदू बाबाने आपल्या कृत्याचे समर्थन करताना अत्यंत धक्कादायक वक्तव्य केले आहे.
'मी जे काही केले तो केवळ पूजाविधीचाच एक भाग होता आणि मी कोणावरही जबरदस्ती केली नाही', असा अजब दावा खरातने केला आहे. धर्माच्या नावाखाली विकृत कृत्यांचा बाजार मांडणाऱ्या या बाबाच्या विधानामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
काय म्हणाला खरात?
अशोक खरात हा महिलांना सिद्ध पूजा, अवतार पूजा आणि योनी शुद्धीकरण अशा विविध नावाखाली आपल्या जाळ्यात ओढत होता. धर्म, ज्योतिष आणि अंकशास्त्र यांसारख्या पवित्र गोष्टींचा आधार घेत त्याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर आरोप आहेत.
आता पोलीस कोठडीत असताना त्याने दिलेले स्पष्टीकरण अधिक संतापजनक आहे. ज्यांचे मी भले केले, तेच आता माझ्यावर उलटले आहेत, असे म्हणत त्याने स्वतःला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पूजेच्या नावाखाली महिलांचे शोषण करणे हा कुठला विधी आहे, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
( नक्की वाचा : Ashok Kharat : 30 वर्षांच्या महिलेचं शोषण आणि 5 नरबळी? अशोक खरातच्या 'त्या' गोळ्यांनी कोर्टात खळबळ )
उत्तेजक औषधांचे अतिसेवन आणि अर्धांगवायूचा झटका
या प्रकरणाच्या तपासात खरातच्या प्रकृतीबाबतही एक महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. 67 वर्षीय अशोक खरातला साधारण दीड वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा म्हणजेच पॅरालिसिसचा सौम्य झटका आला होता. वैद्यकीय तपासणीत याचे कारण उत्तेजक औषधांचे अतिसेवन असल्याचे निष्पन्न झाले होते.
एका खासगी रुग्णालयात वेळेवर उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला, मात्र आजही त्याच्या उजव्या हाताची हालचाल मर्यादित असून भुवयांवरही त्याचे परिणाम दिसून येतात. स्वतःला सिद्ध पुरुष म्हणवून घेणाऱ्या या बाबाच्या वैयक्तिक आयुष्यातील हे वास्तव त्याच्या विकृत मानसिकतेवर प्रकाश टाकणारे आहे.
( नक्की वाचा : Kharat File:'माझ्यावर जादूटोणा करणारा जागीच मेला'; खैरेंचा मोठा दावा, खरातबद्दल CM चं नाव घेत म्हणाले... )
धर्माच्या नावाखालील भोंदूपणा
खरातने केलेल्या या कृत्यामुळे केवळ संताप व्यक्त होत नसून, खऱ्या धार्मिक परंपरांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनीही या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून, अशा भोंदू लोकांमुळे धर्माची बदनामी होत असल्याचे म्हटले आहे. ज्योतिष आणि शास्त्राचा चुकीचा वापर करून स्वतःच्या विकृत इच्छांची पूर्तता करणाऱ्या खरातने श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील रेषा ओलांडली आहे. अशा भोंदू बाबांच्या जाळ्यात आणखी किती लोक अडकले आहेत, याचा शोध आता नाशिक पोलीस घेत आहेत.
नाशिकमध्ये धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या या भोंदूपणाने समाजासमोर एक गंभीर प्रश्न उभा केला आहे. पोलिसांनी खरातचे सर्व दावे फेटाळून लावत तांत्रिक आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.या प्रकरणात आणखी काही पीडित महिला समोर येण्याची शक्यता असून, पोलीस आता खरातच्या संपर्कात आलेल्या लोकांची चौकशी करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world