Mumbai News : मुंबईतील पवई परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बापानेच आपल्या ४ वर्षांच्या लेकाची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. राजेश सिंह असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
अत्यंत क्रूरपणे बाळाला मारहाण...
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश सिंह याच्यासोबत झालेल्या वादानंतर त्याची पत्नी 15 दिवसांपूर्वी दुसऱ्या पुरुषासोबत घर सोडून निघून गेली होती. त्यानंतर राजेश आणि त्याचा 4 वर्षांचा मुलगा एकत्र राहत होते. मुलगा जन्मतः अपंग होता, त्याला चालता-बोलता येत नव्हतं. 29 मे रोजी संध्याकाळी मुलाला भूक लागल्याने तो रडू लागला. यावेळी राजेश नशेत होता. मद्यधुंद अवस्थेतील राजेशला मुलाच्या रडण्याचा राग आला. संतापाच्या भरात मुलाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीदरम्यान राजेशने चिमुकल्याला दरवाज्यावर आपटले. गंभीर मारहाणीनंतर मुलाने हालचाल करणं बंद केलं. त्यानंतर घाबरलेल्या आरोपीने आपल्या बहिणीला बोलावलं. डॉक्टरांकडे नेले असता मुलाला मृत घोषित करण्यात आलं.
शवविच्छेदन अहवालात धक्कादायक कारण
डॉक्टरांनी ४ वर्षांच्या मुलाचे शवविच्छेदन केलं. शवविच्छेदन अहवालात कवटीचं हाड फ्रॅक्चर झाल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. राजेशला दारूचं व्यसन होतं. त्याची पत्नी घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. मात्र राजेशच्या दारू पिण्याच्या सवयीतून त्याची पत्नी घरसोडून निघून गेल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान पवई पोलिसांनी ४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.