गेल्या दशकाहून अधिक काळ मुंबईने एक प्रकारचे अभूतपूर्व स्थैर्य आणि शांतता अनुभवली आहे. 90 च्या दशकातील टोळीयुद्धाचे सावट, खंडणीसाठी येणारे फोन, दिवसाढवळ्या होणारे एन्काउंटर्स आणि सेलिब्रिटींच्या हत्यांचे सत्र हे सगळं आता भूतकाळात जमा झालं आहे, असे वाटत असतानाच शहरात पुन्हा एकदा अस्वस्थता पसरली आहे. चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराने मुंबई पोलिसांसमोर एक गंभीर प्रश्न उभा केला आहे. दाऊद इब्राहिम, छोटा राजन आणि अरुण गवळी यांच्या पतनानंतर मुंबईत निर्माण झालेली गुन्हेगारी विश्वातील पोकळी आता लॉरेन्स बिश्नोई गँग भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर 1 फेब्रुवारी रोजी गोळीबार करण्यात आला.
Photo Credit: PTI
अंडरवर्ल्डवर वर्चस्वाचा प्रयत्न
मुंबईच्या अंडरवर्ल्डचा आलेख पाहिला तर लक्षात येते की, दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर 2003 मध्ये भारतात परतल्यानंतर 'डी-कंपनी'च्या हालचाली थंडावल्या. दाऊदने आपले घातकी कारवायांना ब्रेक लावला, तर छोटा राजन, अरुण गवळी आणि अबु सालेम यासारखे डॉन जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. अश्विन नाईकसारख्या गँगस्टरने गुन्हेगारी सोडून बांधकाम व्यवसायात स्वतःला झोकून दिले. मुंबई पोलिसांनी रवी पुजारी आणि बंटी पांडे यांसारख्या हस्तकांचाही बीमोड केला होता. साधारण 2011 मध्ये पत्रकार जे. डे यांच्या हत्येनंतर मुंबईतील संघटित गुन्हेगारी जवळजवळ संपुष्टात आणण्यात आली होती. मात्र, निसर्गाचा नियम आहे की पोकळी फार काळ टीकून राहात नाही, ती कोणी ना कोणी तरी भरून काढण्याचा प्रयत्न करतोच. त्याच प्रमाणे अंडरवर्ल्डमध्ये निर्माण झालेली पोकळी लॉरेन्स बिश्नोईने हेरली आणि तिथे आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा त्याने प्रयत्न सुरू केलाय.
बिश्नोईची रणनीती: जुनी पद्धत आणि विचारधारेचा रंग
लॉरेन्स बिश्नोई हा मुंबईतील पारंपरिक गुन्हेगारी जगतातील चेहरा नाही, पण त्याने अवलंबलेली पद्धत 90 च्या दशकातील टोळीयुद्धाची आठवण करून देणारी आहे. गेल्या 18 महिन्यांत सलमान खानच्या घराबाहेर झालेली फायरिंग, एनसीपी नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या आणि आता रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेला हल्ला, हा निव्वळ योगायोग नाही. हा मुंबईच्या 'एक्सटॉर्शन इकॉनॉमी'वर ताबा मिळवण्याचा एक सुनियोजित प्रयत्न आहे. 80 आणि 90 च्या दशकात अंडरवर्ल्ड गँग ज्या पद्धतीने काम करायच्या त्याच पद्धतीने बिश्नोई गँग काम करताना दिसते आहे. गल्लीतील बेरोजगार तरुणांना टोळ्यांमध्ये ओढायचे आणि त्यांच्या मार्फत कामे 'वाजवायची' हा फंडा बिश्नोई टोळीने अवलंबला आहे.
दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर केलेल्या गोळीबारात बाल्कनीच्या काचेचे नुकसान झाले होते.
Photo Credit: PTI
हिंदू गँगस्टर म्हणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बिश्नोईने स्वतःला 'हिंदू गँगस्टर' म्हणून प्रोजेक्ट करण्यास सुरुवात केली आहे. ही रणनीती नवी नाही. 93 च्या बॉम्बस्फोटानंतर छोटा राजनने 'देशभक्त डॉन' म्हणून आपली प्रतिमा तयार केली होती, तर रवी पुजारीने डाव्या विचारांच्या सेलिब्रिटींना धमकावून तोच मार्ग पत्करला होता. बिश्नोई गँग देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून विशिष्ट विचारधारेचा रंग देऊन आपल्या गुन्हेगारी कृत्यांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करते आहे.
कारवायांसाठीचे नवे तंत्र आणि पोलिसांसमोरील आव्हान
90 च्या दशकात मुंबई पोलिसांनी सुमारे 500 गुंडांचा एन्काउंटर करून आणि 'मोक्का' (MCOCA) सारख्या कडक कायद्याच्या जोरावर अंडरवर्ल्डचा कणा मोडला होता. मात्र, आजच्या पोलीस दलासमोरचे आव्हान पूर्णपणे वेगळे आहे. ज्या अनुभवी अधिकाऱ्यांना गँगवॉरचे मानसशास्त्र माहिती होते आणि ज्यांच्याकडे मुंबईच्या कानाकोपऱ्यात पसरलेले खबऱ्यांचे जाळे होते ते आता निवृत्त झाले आहेत. आजचा शत्रू मुंबईच्या गल्लीबोळात लपून बसलेला नसून बिश्नोई गँगचे नेटवर्क हे विखुरलेले आहे. फेसबुक आणि व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडियावरून हे नेटवर्क चालवलं जातंय. टोळीचा मुख्य सूत्रधार दुसऱ्या राज्यातील तुरुंगात बसून सर्व कारवाया घडवून आणतोय. अशा परिस्थितीत जुन्या पद्धतीचे 'इन्फॉर्मर नेटवर्क' कितपत प्रभावी ठरेल याबद्दल शंका आहे.