- मुन्ना झिंगाडा हा दाऊद इब्राहिमच्या टोळीतील कुख्यात शूटर होता
- झिंगाडाने मुंबईत वझीरशी वादातून हत्या केली आणि नंतर उत्तर प्रदेशात पळून गेला
- आर्थर रोड जेलमध्ये इस्माईल मलबारीशी भेटून झिंगाडा डी-कंपनीत सामील झाला
जीतेंद्र दीक्षित
"आम्हाला शकील भाईने पाठवले आहे. 6 महिन्यांत छोटा राजनला पुन्हा मारू," अशी उघड धमकी सप्टेंबर 2000 मध्ये एनडीटीव्हीच्या कॅमेऱ्यावर दाऊद इब्राहिम टोळीतील कुख्यात शूटर मुन्ना झिंगाडा याने दिली होती. ज्या वेळी बँकॉक पोलिस त्याला कोर्टात घेवून जात होते. त्याच वेळी त्याने ही धमकी दिली. मुन्ना झिंगाडा हा दाऊद इब्राहिम टोळीतील कुख्यात शूटर आहे. हाच झिंगाडा आता दिल्लीत पकडलेल्या दहशतवाद्यांचा हँडलर असल्याचे समोर आले आहे. 1994 मध्ये छोटा राजनने दाऊदपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गँगवॉर सुरू झाले. या अंतर्गत डी-कंपनीने 'मिशन बँकॉक' आखले होते. त्याची जबाबदारी मुन्ना झिंगाडावर सोपवली होती.
मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या या गुंडाचे खरे नाव सय्यद मुज्जकिर होते. तो नेहमी चरसची गोळी सोबत बाळगायचा. ज्याला मुंबईतील नशेखोर 'झिंगाडा' म्हणत. याच कारणास्तव त्याला हे नाव झिंगाडा पडले होते. झिंगाडा जोगेश्वरीत पदवीचे शिक्षण घेत असताना त्याचा स्थानिक गुंड वझीरशी वाद झाला होता. या वादातून फेब्रुवारी 1990 मध्ये त्याने वझीरची चाकू मारून हत्या केली. त्यानंतर तो स्वत: पोलीसांच्या हवाली झाला होता. दोन वर्षांनंतर तो जामिनावर बाहेर आला.
झिंगाडा जेलबाहेर आल्यानंतर एक चांगलं आयुष्य जगण्याचा प्लॅन करत होता. त्याला कोणती ही भानगड नको होती. शिवाय तो आपल्या वडीलांच्या प्लंबिंगच्या व्यवसायात त्यांची मदत ही करू लागला होता. पण ज्या वझीरचा खून त्याने केला होता त्याचे भाऊ झिंगाडाचा गेम करण्याच्या तयारीत होते. त्याच एक दिवस वझीरचा भाऊ झिंगाडाला मारण्यासाठी आला. त्यावेळी झिंगाडाने प्रतिकार करत वझीरच्या भावाचे डोके फोडले. त्यानंतर ही दुष्मनी सुरूच राहीली. शेवटी 1995 साली झिंगाडाने वझीरच्या भावाचा खून केला. या खूनानंतर त्याला जेलमध्ये जायचे नव्हते. त्यामुळे तो मुंबईतून पळून उत्तर प्रदेशात गेला. त्यावेळी त्याने स्वताच्या संरक्षणासाठी एक गावठी कट्टा सोबत ठेवला.
मुंबई पोलीस त्याचा अनेक दिवसापासून शोध घेत होती. शेवटी त्यांनी झिंगाडाला अटक केली. त्यानंतर त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली. हाच त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. तिथे त्याची भेट डी-कंपनीच्या इस्माईल मलबारीशी झाली. झिंगाडाची क्रूरता पाहून मलबारीने छोटा शकीलशी त्याचा संपर्क करून दिला. त्यानंतर तो डी-कंपनीमध्ये दाखल झाला. डी कंपनीनेच पुढे त्याची जामिनावर सुटका केली. डी कंपनीत दाखल झाल्यानंतर छोटा शकीलने त्याला पहिलं काम दिलं. ते म्हणजे डॉन अरुण गवळीची हत्या करण्याचं.
गवळीच्या गुंडांनी दाऊदचा मेहुणा इब्राहिम पारकर याची हत्या केली होती. त्याचा दाऊदला बदला घ्यायचा होता. 1997 मध्ये आझाद मैदानावर अरूण गवळी त्याच्या पक्षाची सभा घेणार होता. त्या सभेत झिंगाडा एका पुष्पगुच्छामध्ये बंदूक लपवून पोहोचला होता. पण त्या सभेला अरूण गवळी आलाच नाही आणि ते मिशन फेल झालं. त्यानंतर झिंगाडाने छोटा राजनच्या सांगण्यावरून मुंबईत अनेक हत्या केल्या. 1997 मध्ये छाटा राजनचा खास असलेल्या कुशल जैनची हत्या झिंगाडाने केली. या हत्येनंतर पोलीस झिंगाडाला सगळीकडे शोधत होते. त्याच वेळी छोटा शकीलने त्याला नेपाळमार्गे दुबईत पळून जाण्यास मदत केली. पुढे तो पाकिस्तानात गेला.
याच कालावधीत छोटा राजन बँकॉक येथे राहत असल्याची माहिती छोटा शकीलला मिळाली. त्यानंतर छोटा शकीलने अशोक शेट्टी नावाच्या व्यक्तीला राजनच्या टोळीत पाठवले. टोळीत गेल्यानंतर त्याने राजनच्या लोकांना आपल्या बाजूने वळवले. त्यांना पैशाचे आमिष दाखवे. त्यातून त्याने राजनचा पत्ता शोधून काढला. त्यानंतर 15 सप्टेंबर 2000 रोजी अशोक शेट्टी केक घेऊन रोहित वर्माच्या फ्लॅटवर पोहोचला. दरवाजा उघडताच झिंगाडा आणि त्याच्या साथीदारांनी जबरदस्त गोळीबार सुरू केला. यात रोहित वर्मा मारला गेला. छोटा राजन एका रूम मध्ये होता. त्याने आतून दरवाजा बंद केला होता. पण झिंगाडाने त्याच्यावरही धडधड गोळ्या झाडल्या. त्याच वेळी छोटा राजन बाल्कनीतून खाली उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाला. बँकॉक पोलिसांनी राजनलानंतर रूग्णालयात दाखल केले. राजनचा जीव वाचला.
हा हल्ला झाल्यानंतर थोड्या वेळातच बँकॉक पोलिसांनी झिंगाडाला अटक केली. त्याला कोर्टात नेत असताना त्याने कॅमेऱ्यासमोर कबूल केलं की शकील बॉसने त्याला राजनला मारण्यासाठी पाठवलं होतं. शिवाय पुढच्या सहा महिन्यात राजनला डी कंपनी संपवेल असं ही तो म्हणाला होता. त्यानंतर भारताने त्याच्या प्रत्यार्पणाचा प्रयत्न केला. पण कायदेशीर लढाईत यश आले नाही. थायलँड सरकारने त्याला पाकिस्तानच्या स्वाधीन केले. मुन्ना झिंगाडा मुंबई पोलीसांच्या हाती लागला नाही. पण 19 नोव्हेंबर 2009 रोजी मुंबई गुन्हे शाखेने बोरीवलीत एका चकमकीत मुन्नाचा भाऊ आणि डी-कंपनीचा शूटर इमरान झिंगाडा याला ठार केले. भावा प्रमाणेच इमरान झिंगाडा हा डी कंपनीसाठी काम करत होता. त्याच्यावर 6 खूनांचा आरोप होता. त्याने मलेशियामध्ये छाटा राजनचा खास असलेल्या बाळू डोकरे याची हत्या केली होती.