महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. कुठे हुंडाबळी तर कुठे एकतर्फी प्रेमातून महिलांचे खून केले जात आहेत. दिल्लीत एका विवाहीतेला हुंड्यासाठी जिवंत जाळण्याची घटना ताजी असतानाच तशीच एक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. या घटनेनं सर्वच जण हादरले आहेत. दिल्ली पेक्षा ही घटना अधिक धक्कादायक आणि गंभीर आहे. कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. येथे एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीच्या तोंडात ज्वलनशील पदार्थ टाकून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी पळून जात होता. पण स्थानिक लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्याने संपूर्ण सत्य सांगितले.
नक्की वाचा - MNS News: मनसेला जबर हादरा! बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी; राज ठाकरेंचा आदेश
ही घटना म्हैसूर जिल्ह्यातील सालिगराम तालुक्यातल्या भेर्या गावात घडली. मृत रक्षिता (वय २०) हिचे लग्न केरळमधील एका मजुरासोबत झाले होते. पण तिचे बेट्टाडापुरा गावातील तिचा नातेवाईक सिद्धाराजू सोबत कथित अनैतिक संबंध होते. घटनेच्या दिवशी रक्षिता आणि सिद्धाराजू एका लॉजमध्ये थांबले होते. जिथे त्यांच्यात कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाला. असे सांगितले जात आहे की, सिद्धाराजूने तिच्या तोंडात आधी ज्वलनशील पदार्थ टाकला आणि नंतर खाणींमध्ये जिलेटिनच्या कांड्या फोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रिगरने तो पदार्थ फोडून तिची हत्या केली.
हत्या केल्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याला स्थानिक लोकांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीने खोटा दावा करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितले की महिलेचा मृत्यू मोबाईल फोनच्या स्फोटामुळे झाला. मात्र नंतर त्याने पोलिसांना संपूर्ण सत्य सांगितले. पोलिसांनी माहिती दिली की, मृतदेहाची ओळख पटली आहे. आरोपी सिद्धाराजूला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.