
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नवी धुसफूस सुरू झाली आहे. त्याला कारण ठरलं आहे ते नगरविकास खात्याच्या गोगलगायीच्या चालीनं चाललेला कारभार. केंद्राच्या विविध योजना राज्यात नगरविकास खात्याच्या माध्यमातून राबवल्या जातात. त्या योजना प्रभावीपणे आणि वेगानं राबवल्या जात नसल्याचा फडणवीसांचा आक्षेप आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नगरविकास खात्याची बैठक घेतली. केंद्र सरकारच्या विविध योजना नगरविकास खातं प्रभावीपणे राबवू शकलेलं नाही, असं त्यांना या बैठकीत दिसून आलं. त्यामुळे या दोघांमधली धुसफूस समोर आली आहे.
नगरविकास विभागांतर्गत असलेल्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत कल्याणकारी योजना राबवायला प्रचंड उशीर झाला. अमृत 2.0 अंतर्गत राज्याला 9 हजार कोटी मिळाले होते. 2021 मध्ये मिळालेला हा निधी योजनांसाठी 2026 पर्यंत प्रभावीपणे वापरायचा आहे. अमृत योजने अंतर्गत सर्व योजना निश्चित मुदतीत पूर्ण व्हायला हव्या. केंद्राकडून मिळालेल्या निधीचा पूर्ण उपयोग करून या सगळ्या योजना 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण झाल्या पाहिजेत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नसल्याची माहिती आहे.
नक्की वाचा - MNS News: मनसेला जबर हादरा! बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी; राज ठाकरेंचा आदेश
मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्याबद्दल नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंना ही विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले. महाराष्ट्र नंबर वन आहे, असं म्हणत त्यांनी अधिक बोलण्याचं टाळलं. त्यांची ही प्रतिक्रीयाच बोलकी होती. महायुतीत सेना-भाजपमध्ये जी धुसफूस सुरू आहे, त्याबद्दल तिसऱ्या पार्टनरला म्हणजे अजित पवारांनाही या नाराजीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार बोलले, मात्र नाराजीबद्दल अजित पवारांनी एक शब्दही काढला नाही.
महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल असल्यानं ठाकरे गटानं टीकेची संधी सोडली नाही. ठाकरे गटानं एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. शिवाय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास मंत्र्यांना बडतर्फ करावं अशीच मागणी केली आहे. डिसेंबरमध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर पुढच्या दोन महिन्यांतच महायुतीत विशेषतः सेना भाजपमध्ये कुरघोड्या सुरू झाल्या. रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रिपद, शिंदेंच्या मंत्र्यांच्या पीए,ओएसडींची बराच काळ रखडलेली नियुक्ती, एसटी महामंडळाच्या अध्यक्ष आणि सचिव पदावरुन राजकारण यावरूनही नाराजी नाट्य दिसून आले.
त्यात भर म्हणून की काय अधिकारी परस्पर निर्णय घेत असल्यानं उदय सामंतांचं अधिकाऱ्यांना पत्र, मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची वेगवेगळी वॉररूम, शिंदे गटाच्या आमदारांचे आणि नेत्यांचे समोर आलेले व्हिडीओ, अशी ही कुरघोड्यांची यादीच आहे. आता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी शिंदेंच्या नगरविकास खात्यावर नाराजी व्यक्त केलीय. त्यावर एकनाथ शिंदेंनी उत्तर देणं टाळलं आहे. मात्र येत्या काळात पुन्हा कुरघोड्यांचं राजकारण रंगणार, अशीच चिन्हं सध्या दिसत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world