Nagpur News: 35 वर्षांच्या व्यक्तीशी होत होता 15 वर्षांच्या मुलीचा विवाह; भर मंडपातून पोलिसांनी कसं वाचवलं?

Nagpur News: नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातून एक अतिशय संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Nagpur News: धार्मिक कार्यक्रमाच्या गर्दीत हा प्रकार सुरु होता. (प्रतिकात्मक फोटो)
नागपूर:

Nagpur News: नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातून एक अतिशय संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह 35 वर्षांच्या व्यक्तीसोबत लावून दिला जात असताना प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करत हा बालविवाह रोखला आहे. विशेष म्हणजे, एका धार्मिक कार्यक्रमाच्या आडून हा बेकायदेशीर विवाह उरकून घेण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेमुळे एका आठवीत शिकणाऱ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले.

धार्मिक कार्यक्रमाच्या आडून बालविवाहाचा डाव

नरखेड तालुक्यातील मालापूर येथे एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या गर्दीचा फायदा घेऊन 15 वर्षीय मुलीचा विवाह 35 वर्षीय नवरदेवाशी लावून देण्याची तयारी सुरू होती.

Advertisement

 ही मुलगी अवघ्या आठवीत शिकणारी असून तिचे वय लग्नासाठी कायदेशीररीत्या योग्य नव्हते. या विवाहाची कुणकुण बाल संरक्षण कक्षाला लागताच त्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आणि पोलिसांना पाचारण केले.

( नक्की वाचा : माहेरच्यांनी 22 वर्षे ऐकला नाही आवाज! फरार कल्पना खरातच्या भावाचा आणि वडिलांचा दुर्दैवी अंत; पाहा वास्तव )

पोलिसांचा तातडीने हस्तक्षेप आणि रेस्क्यू

तक्रार प्राप्त होताच कोंढाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लग्नाचा विधी सुरू असतानाच पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला आणि त्या अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका केली. पोलिसांनी या मुलीला रेस्क्यू केल्यानंतर तिला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. 35 वर्षांच्या नवरदेवासोबत 15 वर्षांच्या मुलीचे लग्न लावून देण्याच्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत नरखेड पोलीस स्टेशनमध्ये संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमासह अत्यंत कडक अशा पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गतही कारवाई केली जात आहे. 

केवळ मुलीचे कुटुंबच नाही, तर या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजक आणि या विवाहात सहभागी होऊन त्याला प्रोत्साहन देणाऱ्या उपस्थित व्यक्तींवरही कायदेशीर बडगा उगारला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवली हादरली! पालिका अधिकाऱ्या महिला कर्मचाऱ्याला व्हॉट्सॲप कॉल; सेटलमेंटसाठी मागितलं 'सुख' )

सुटका झालेल्या मुलीचं काय होणार?

सुटका केलेल्या मुलीला सध्या सुरक्षिततेच्या कारणास्तव बालगृहात ठेवण्यात येणार आहे. तिची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली असून, तिच्या भविष्यातील काळजी आणि संरक्षणाबाबतचा निर्णय बालकल्याण समिती घेणार आहे. या घटनेमुळे नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा बालविवाहाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अशा बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध प्रशासनाने अधिक कठोर पवित्रा घेतला आहे.

Advertisement
Topics mentioned in this article