संजय तिवारी, नागपूर: नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी मानसिक आणि शारिरिक छळ होत असल्याचा आरोप करत एका महिला वकिलाने न्यायाधीश सासरे, व्यवसाय करणारा पती आणि सासरच्या अन्य मंडळी विरूध्द तक्रार नोंदवली आहे. वकील महिलेने केलेल्या या तक्रारीमध्ये अनेक गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, नागपुर शहरातील एका महिला वकिलाने पतीकडून वारंवार अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची, तसेच सासरच्या घरात जादू टोणा आदी प्रकार करण्यात येत असल्याची तसेच न्यायालयात जाण्यास मनाई करण्यात आल्याचे आणि वकिली बंद करण्यासाठी सांगितले जात असल्याची तक्रार नोंदवली आहे. तिला सासरच्या मंडळी कडून माहेरून पन्नास लाख रुपये हुंडा आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला असल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धक्कादायक बाब म्हणजे सासऱ्यांकडून अश्लील चाळे करण्यात आले तसेच खोलीचे दार उघडे ठेवून झोपा आणि घरातील कॅमेरे सुरू ठेवा असे सांगण्यात येत असल्याचा आरोप देखील तक्रारीत आहे. याप्रकरणी अजनी पोलिसांनी पती, न्यायाधीश असलेले सासरे तसेच सासू आणि नणंद विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, राज्यामध्ये अत्याचाराच्या घटनांची मालिका सुरुच असून डोंबिवलीमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. डोंबिवलीमधील डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. राजू येले असे आरोपीचे नाव नाव असून अत्याचाराच्या घटनेनंतर आठ दिवसांपासून तो फरार आहे.
(नक्की वाचा - CIDCO Lottery : सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती जाहीर, 25 लाखांपासून मिळणार स्वप्नांचं घर, अर्जाची अंतिम मुदत कधीपर्यंत?)
आठ दिवस उलटणही आरोपी अद्याप फरार असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलीस प्रशासनाला धारेवर धरले आहे. या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली असून नराधमाला तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.